Join us  

हार्दिक पांड्या होणार टी-२० संघाचा कर्णधार, वनडेतून घेतला ब्रेक; उपकर्णधारपदासाठी २ दावेदार!

टी-२० मालिकेचा पहिला सामना २७ जुलै रोजी होणार आहे. महत्वाचे म्हणजे, हार्दिक पांड्या वनडे मालिकेसाठी संघाचा भाग नसेल...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 4:51 PM

Open in App

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पंड्या श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी टीम इंडियाचा कर्णधार असेल. भारतीय क्रिकेट संघ या महिन्यातच श्रीलंका दौऱ्यावर जात आहे. टीम इंडिया श्रीलंकेत तीन सामन्यांची टी-२० मालिका आणि तीन सामन्यांचीच एकदिवसीय मालिका खेळायची आहे. टी-२० मालिकेचा पहिला सामना २७ जुलै रोजी होणार आहे. महत्वाचे म्हणजे, हार्दिक पांड्या वनडे मालिकेसाठी संघाचा भाग नसेल.

पीटीआयने बीसीसीआयच्या एका सूत्राचा हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, "हार्दिक पांड्या भारतीय टी-२० संघाचा उपकर्णधार होता. तो पूर्णपणे तंदुरुस्त असून तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठीही उपलब्ध आहे. तो या मालिकेसाठी कर्णधार असेल." याच बरोबर, श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत शुभमन गिल अथवा सूर्यकुमार यादव उपकर्णधार असू शकतात, असेही या वृत्तात म्हणण्यात आले आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यात २७ जुलैपासून तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर रोहित शर्माने टी-२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. यामुळे भारतीय क्रिकेट बोर्ड या फॉरमॅटसाठी नवीन कर्णधाराच्या शोधात आहे. मात्र, हार्दिक पांड्या टी-२० मध्ये टीम इंडियाचा कायमस्वरूपी कर्णधार असेल की नाही, हे अद्याप निश्चित झालेले नाही.

एकदिवसीय मालिकेसंदर्भात एका अधिकाऱ्याने म्हटले आहे की, पंड्याने वैयक्तिक कारणांमुळे ब्रेक मागितला आहे. यासंदर्भात कर्णधार रोहित शर्मालाही कळवण्यात आले आहे. तसेच, रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांनी श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळावे. असे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना वाटते, असेही एका वृत्तात म्हणण्यात आले आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकाटी-20 क्रिकेटहार्दिक पांड्यारोहित शर्मासूर्यकुमार अशोक यादव