भारतीय क्रिकेट संघ सध्या टी20 विश्वचषक 2022 ची तयारी म्हणून अनेक टी-20 मालिका खेळत आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील भारतीय संघात (Indian Team) सध्या अनेक बदल होताना दिसत आहेत. आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी करून अनेक स्टार खेळाडूंनी संघात स्थान निर्माण केले आहे. मात्र यातच, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघातील दोन स्टार खेळाडूंची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. आता हे खेळाडू भारतीय संघासाठी सर्वात मोठे ओझे ठरत आहेत. आधी हे खेळाडू भारतीय संघाची ताकद मानले जात होते.
भारतीय क्रिकेट संघाचा सुपरस्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) गेल्या काही दिवसांपासून खराब फॉर्मचा सामना करत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली विराट कोहलीला एकही मोठी खेळी खेळता आलेली नाही. त्यांचे मनोबल कमालीचे घसरले आहे. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये त्याला गेल्या काही सामन्यांत एकही शतक झळकावता आलेले नाही. यामुळे सध्या भारतीय संघासाठी तो एक मोठा गुन्हेगार ठरत आहे. याचबरोबर कोहलीला बहुतांश सामन्यांमध्ये विश्रांतीही दिली जात आहे.
या विकेटकीपरलाही करावा लागतोय खराब फॉर्मचा सामना -बीसीसीआयने ऋषभ पंतला जेवढ्या संधी दिल्या तेवढ्या क्वचितच कुणाला देण्यात असतील. ऋषभ पंत हा कसोटी सामन्यांत अव्वल क्रमांकाचा यष्टीरक्षक फलंदाज आहे. मात्र, पांढऱ्या चेंडूने खेळल्या जाणाऱ्या क्रिकेटमध्ये तो सपशेल अपयशी ठरला आहे. तो एका सामन्यात धावा करतो, तर पुढील चार सामन्यांमध्ये त्याची बॅट शांत राहते. ऋषभ पंतने भारतासाठी आत्तापर्यंत एकूण 50 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यांत त्याने 22 अत्यंत सामान्य सरासरीने आणि 125 च्या स्ट्राइक रेटने 768 धावा केल्या आहेत. खरे तर पंतमुळे इशान किशन आणि संजू सॅमसनसारख्या यष्टीरक्षकांनाही संधी मिळणे अवघड झाले आहे.