Asia Cup 2022: क्रिकेट जगतात सध्या चाहत्यांच्या नजरा आशिया कप स्पर्धेकडे लागल्या आहेत. प्रेक्षकांना रोजच रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. बांगलादेशचा संघ आशिया चषक स्पर्धेत चांगली कामगिरी करू शकला नाही. अफगाणिस्तानने प्रथम बांगलादेशचा ७ विकेट्सने पराभव केला. त्यानंतर श्रीलंकेविरुद्धच्या अटीतटीच्या सामन्यात बांगलादेशला २ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला. हा पराभव जिव्हारी लागल्याने दु:खी झालेला बांगलादेशचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज आणि माजी कर्णधार मुशफिकुर रहीम (Mushfiqur Rahim) याने तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली आहे. यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
आशिया कपमध्ये बांगलादेशच्या खराब कामगिरीनंतर यष्टिरक्षक फलंदाज मुशफिकुर रहीमने निवृत्ती जाहीर केली आहे. आशिया चषकात त्याला त्याच्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. अफगाणिस्तानविरुद्ध तो ४ चेंडूत १ धाव काढून पॅव्हेलियनमध्ये परतला, तर श्रीलंकेविरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यात त्याने ५ चेंडूत ४ धावा केल्या. याआधी मुशफिकुर रहीमने बांगलादेशसाठी अनेक सामने स्वबळावर जिंकवले होते. पण त्याच्या बॅटची जादू आशिया कपमध्ये चालली नाही.
ट्विटरच्या माध्यमातून केली निवृत्तीची घोषणा
मुशफिकुर रहीमने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून निवृत्तीची घोषणा केली. "मला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करायची आहे. क्रिकेटच्या कसोटी आणि एकदिवसीय फॉरमॅटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी मी हा निर्णय घेत आहे. जेव्हा संधी मिळेल तेव्हा मला फ्रँचायझी लीग (टी२० लीग क्रिकेट) खेळायची आहे. त्यासाठी मी उपलब्ध असेन. मात्र देशासाठी मी दोन फॉरमॅटमध्ये खेळण्यास उत्सुक आहे", असे त्याने स्पष्ट केले.
मुशफिकुर रहीमने त्याच्या टी२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १०० हून अधिक टी२० सामने खेळले आहेत. मुशफिकुरने नोव्हेंबर २००६ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध टी२० आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. यानंतर त्याने आतापर्यंत १०२ सामने खेळले आहेत. या दरम्यान मुशफिकुरने १५०० धावा केल्या. या फॉरमॅटमध्ये त्याने ६ अर्धशतके झळकावली आहेत. तसेच त्याने यष्टिरक्षणाच्या क्षेत्रातही चांगली कामगिरी करून दाखवली.