मुंबई, दि. 04 - बीसीसीआयच्या इंडियन प्रीमीयर लीग(आयपीएल)च्या 2018 ते 2022 या पाच वर्षांच्या मीडिया हक्कांसाठी आज मुंबईत लिलाव सुरु आहे. यामध्ये स्टार इंडियाने सर्वाधिक जास्त बोली लावून बाजी मारली आहे.
आयपीएल मीडिया हक्क स्टार इंडियाने घेतले असून यासाठी स्टार इंडियाने 16 हजार 347.50 कोटींची सर्वाधिक जास्त बोली यावेळी लावली. या लिलावात जगभरातील नामांकित 24 कंपन्यांनी सहभाग नोंदविला होता. मात्र, यापैकी फक्त 14 कंपन्यांनी प्रत्यक्षरित्या आर्थिक बोलीसाठी पाहावयास मिळाल्या. पण, यातील एक कंपनी पात्रता फेरीत बाद झाली. 13 कंपन्यांनी आयपीएलचे हक्क आपल्याला मिळावे यासाठी जोरदार प्रयत्न केले. यामध्ये स्टार इंडिया आणि सोनी पिक्चर्स यांच्यात खरी चुरस पाहायला मिळाली. मात्र, यामध्ये स्टार इंडियाने सर्वाधिक जास्त बोली लावून लिलाव जिंकला.
आयपीएलच्या मीडिया हक्कांची टेलिव्हिजन आणि डिजिटल अशा दोन माध्यमांमध्ये विभागणी करण्यात आली होती. यावेळी या लिलावात सोनी, बी स्पोर्ट्स, सुपरस्पोर्ट, फॉलोऑन, Yupp TV, टाईम्स इंटरनेट, फेसबुक, एअरटेल, BAM Tech, इको नेट, परफॉर्म ग्रुप, रिलायन्स जिओ अशा अनेक मोठ्या कंपन्यानी सहभाग घेतला होता. तर, डिजीटल हक्कांसाठी अमेझॉन, ट्विटर, डिस्कव्हरी, फेसबुक, एअरटेल यासारख्या दिग्गज कंपन्यांनी प्रयत्न केले. मात्र टेलिव्हिजन आणि डिजिटल संपूर्ण भारत आणि जगभरातील सर्व मीडिया हक्क मिळवण्यात स्टार इंडियानेच बाजी मारली.
आयपीएलच्या गेल्या दहा पर्वांसाठी टेलिव्हिजनचे हक्क सोनी पिक्चर्स नेटवर्ककडे होते. सोनीने 2008 साली 4200 कोटींची बोली लावून टेलिव्हिजनचे हक्क स्वत:कडे घेतले होते. त्यानंतर 2015 साली नोवी डिजिटलने 302.2 कोटी रुपये मोजून तीन वर्षांसाठी डिजिटलचे हक्क मिळविले होते.