भारतीय महिला संघाची उप कर्णधार आणि ओपनर स्मृती मानधना ( Smriti Mandhana) हिने इंग्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत सातत्यपूर्ण कामगिरी केल्यानंतर पहिल्या वन डे सामन्यतही ९१ धावांची मॅच विनिंग खेळी केली. तिच्या या कामगिरीची ICC नेही दखल घेतली आणि ICC महिला खेळाडूंच्या ट्वेंटी-२० क्रमवारीत भारताच्या मानधनाने गरुडझेप घेतली. ऑस्ट्रेलियाची अनुभवी जोडी बेथ मूनी व मेग लॅनिंग यांनी ट्वेंटी-२० क्रमवारीत वर्चस्व गाजवले. स्मृती मानधनाने भारताकडून अधिकाधिक क्रिकेट खेळता यावं यासाठी WBBL मधून माघार घेणार असल्याचा निर्धार बोलून दाखवला. तिने तिचं हे देशप्रेम क्रिकेटच्या मैदनावर सातत्यपूर्ण कामगिरी करून सिद्धही केलं.
स्मृती मानधनाचे देशप्रेम! भारतासाठी लाखो रुपयांवर पाणी सोडणार, मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
इंग्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मलिकेत स्मृतीने १११ धावा केल्या आणि तिने ट्वेंटी-२० महिला फलंदाजांच्या क्रमवारीत दोन क्रमांकाच्या सुधारणेसह दुसरे स्थान पटकावले आहे. बेथ मूनी ७४३ रेटींग पॉईंट्ससह अव्वल स्थानावर आहे. स्मृती १२ पॉईंट्सच्या पिछाडीसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. मेग लॅनिंगची ( ७२५ ) तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे, तर न्यूझीलंडची सोफी डेव्हि ( ७१५० चौथ्या क्रमांकावर सरकली आहे. वन डे क्रमवारीतही स्मृतीने तीन क्रमांकाच्या सुधारणेसह सातवे स्थान पटकावले आहे. कर्णधार हरमनप्रीत कौर चार स्थानांच्या सुधारणेसह नवव्या, तर यास्तिका भाटीया ८ स्थान वर सरकून ३७व्या क्रमांकावर पोहोचली आहे. या दोघींनी इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वन डेत अर्धशतकी खेळी केली होती.
इंग्लंडच्या केट क्रॉसने भारताविरुद्धच्या त्या वन डेत दोन विकेट्स घेतल्या होत्या आणि ती ३ क्रमांकाच्या सुधारणेसह गोलंदाजांच्या क्रमवारीत १०व्या क्रमांकावर पोहोचली आहे. इंग्लंडचीच चार्लोट डीन २०व्या क्रमांकावर पोहोचली आहे. भारताच्या दीप्ती शर्माने या सामन्यात दोन विकेट्स घेतल्या होत्या आणि तिने ६ स्थान वर सरकत १२ वा क्रमांक पटकावला आहे.