भारतीय पुरुष व महिला संघ आशियाई स्पर्धा २०२३ ( Asian Games 2023) स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी सज्ज झाला आहे. १९ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत हँगझोऊ येथे क्रिकेटच्या स्पर्धा होणार आहेत. भारतीय पुरुष संघ ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली, तर महिला संघ हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली आशियाई स्पर्धेत सहभागी होणार आहे. प्रमुख खेळाडू वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणार असल्याने ऋतुराजच्या नेतृत्वाखाली युवा संघांची या स्पर्धेसाठी निवड केली गेली आहे. तेच दुसरीकडे हरमनप्रीतला दोन सामन्यांची बंदी घातली गेल्याने पहिल्या दोन सामन्यांत स्मृती मानधाना नेतृत्व सांभाळेल. हरमनप्रीत थेट फायनलमध्ये सहभागी होईल.
महिला क्रिकेट स्पर्धा १९ ते २८ सप्टेंबर या कालावधीत पार पडेल. पुरुष व महिलांचे क्रिकेट सामने ट्वेंटी-२० फॉरमॅटमध्ये खेळवले जाणार आहेत. पुरुष गटात भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश यांनी उपांत्यपूर्व फेरीत आधीच जागा पक्की केली आहे. या संघांची आयसीसी क्रमवारीत रँकिंग चांगली असल्याने त्यांना थेट उपांत्यपूर्व फेरीत खेळायचे आहे. भारतीय पुरुष संघाचा पहिला सामना ३ ऑक्टोबरला होणार आहे, परंतु त्याआधी संघातील स्टार गोलंदाज शिवम मावी याला दुखापत झाली आहे. शिवमने भारताकडून ६ ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत. पण, त्याला दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार घ्यावी लागणार असल्याचे संकेत आहेत.
इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार मावीच्या जागी बीसीसीआय उम्रान मलिकला संघात सहभागी करून घेण्याच्या तयारीत आहेत. वेस्ट इंडिजविरुद्धच्या नुकत्याच पार पडलेल्या ५ ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेत उम्रान खेळला होता. मावीच्या दुखापतीनंतर निवड समिती लखनौ सुपर जायंट्सचा गोलंदाज यश ठाकूर याला पाठवण्याच्या तयारीत होते, परंतु तोही जखमी झाला आहे. व्ही व्ही एस लक्ष्मणच्या मार्गदर्शनाखाली हा संघ आशियाई स्पर्धेत खेळणार आहे.
भारताचा पुरूष संघ - ऋतुराज गायकवाड ( कर्णधार), यशस्वी जैस्वाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा ( यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, शिवम मावी, शिवम दुबे, प्रभसिमरन सिंग ( यष्टिरक्षक); राखीव - यश ठाकूर, साई किशोर, वेंकटेश अय्यर, दीपक हुडा, साई सुदर्शन