Join us  

हजारो लोकांच्या डोक्यावरचं छत्र हरपलंय; भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी राशिदचं कळकळीचं आवाहन

अफगाणिस्तानमध्ये मोठ्या भूकंपामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 4:38 PM

Open in App

Afghanistan Earthquake : अफगाणिस्तानमध्ये मोठ्या भूकंपामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. भारतात वन डे विश्वचषकाचा थरार रंगला आहे, तर अफगाणिस्तानातभूकंपामुळे स्थानिक जनता त्रस्त आहे. अफगाणिस्तानचा संघ देखील विश्वचषकासाठी भारतात आला आहे. पण, आपला देश मोठ्या समस्येचा सामना करत असल्याचे पाहून स्टार अष्टपैलू खेळाडू राशिद खान मदतीसाठी पुढे सरसावला आहे. आपल्या देशातील भूकंपग्रस्तांना मदत करण्यासाठी राशिदने एक मोहिब राबवली आहे. तसेच त्याने आधीच जाहीर केले आहे की, तो वर्ल्ड कपमध्ये मिळालेली संपूर्ण मॅच फी भूकंपग्रस्तांना देणार आहे.

राशिद खानने सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे करण्याचे आवाहन सर्वांना केले. त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट करत म्हटले की, भूकंपाच्या मोठ्या धक्क्यामुळे संपूर्ण गावे भुईसपाट झाली आहेत. १ हजार हून अधिक लोकांच्या घरावर छप्पर नाही. अशा स्थितीत त्यांना मदत करायला हवी. कारण पुढील एका महिन्यातच कडाक्याची थंडी पडेल. मी सर्व पक्षांना या प्रयत्नात सामील होण्याचे आवाहन करतो आणि पीडितांना निवारा आणि इतर मूलभूत गरजा पुरवण्यात मदत करण्यासाठी पुढे यायला सांगतो. त्यामुळे खाली दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन शक्य तेवढी मदत करा.

अफगाणिस्तानमध्ये भूकंपामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शनिवारी भीषण भूकंप झाला आणि त्यामुळे सर्वत्र हाहाकार माजला. अफगाणिस्तानमध्ये असलेल्या तालिबान सरकारच्या म्हणण्यानुसार, या भूकंपामुळे आतापर्यंत २ हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, ९ हजारहून अधिक लोक जखमी झाले आहेत आणि १३०० हून अधिक घरे उद्ध्वस्त झाली आहेत. अफगाणिस्तानातील या भूकंपामुळे मृतांची आणि जखमींची संख्या झपाट्याने वाढत आहे. दुसरीकडे, अफगाणिस्तानचा स्टार राशिद खान सध्या भारतात आयसीसी वन डे क्रिकेट विश्वचषक खेळत आहे. 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपअफगाणिस्तानभूकंप