सिडनी, दि. 18 - आगामी भारत दौ-यातील एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने शुक्रवारी आपल्या संघाची घोषणा केली. सप्टेंबर महिन्यापासून भारत-ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेट मालिकेला सुरुवात होणार आहे. अष्टपैलू क्रिकेटपटू जेम्स फॉकनर आणि वेगवान गोलंदाज नाथन कोल्टर यांना ऑस्ट्रेलियन संघात स्थान मिळाले आहे. अॅशटॉन अगार आणि हिलटॉन कार्टराईट या दोघांनाही संघात पुनरागमन केले आहे. ऑस्ट्रेलियाचा भेदक गोलंदाज मिचेल स्टार्कला निवड समितीने विश्रांती दिली आहे.
ऑस्ट्रेलियाचा संघ 17 सप्टेंबर ते 13 ऑक्टोंबर या कालावधीत भारतात एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय निवड समितीने वनडेसाठी 14 तर टी-20 साठी तेरा सदस्यीय संघाची घोषणा केली.
आणखी वाचा स्पेशालिस्टसोबत धोनीने केला सरावबीसीसीआय सरकारकडे परवानगी मागणार
भारतातील कठिण परिस्थितीचा सामना करण्यासाठी आम्ही मजबूत संघ निवडला आहे. या संघात वेगवान आणि फिरकी गोलंदाजीचे योग्य संतुलन आहे असे मुख्य निवडकर्ते ट्रेव्हॉर यांनी सांगितले. नाथान दमदार कामगिरी करेल असा विश्वास क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे निवडकर्ते ट्रेव्हॉर यांनी व्यक्त केला. दुखापतीमुळे दुर्लक्षित झालेल्या नाथान कोल्टरने इंडियन प्रिमियर लीगच्या दहाव्या मोसमात दमदार कामगिरी करुन निवड समितीचे लक्ष वेधून घेतले. आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना त्याने आठ सामन्यात 15 विकेट घेतल्या.
भारतीय खेळपट्टयांवर जेम्स फॉकनर धोकादायक ठरु शकतो. उपखंडातील खेळपट्ट्यांवर फॉकनरने नेहमीच चांगली कामगिरी केली आहे. गोलंदाजीपेक्षा फलंदाजीत फॉकनर जास्त धोकादायक आहे. 2015 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये फॉकनरला सामनावीराचा पुरस्कार मिळाला होता. पण इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये फॉकनरला ऑस्ट्रेलियन संघात स्थान मिळाले नव्हते.
पश्चिम ऑस्ट्रेलियाचा हिलटॉन कार्टराईटाने वर्षाच्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या 25 वर्षीय खेळाडूची जोरदार फटकेबाजी करण्याची क्षमता असल्यामुळे त्याला ऑस्ट्रेलियन संघात स्थान मिळाले आहे.
ऑस्ट्रेलिया वनडे टीम स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), डेव्हीड वॉर्नर, अॅशटॉन अगर, हिलटॉन कार्टराईट, नाथान कोल्टर, पॅट कमिन्स, जेम्स फॉकनर, अॅरॉन फिंच, जोश हेझलवूड, ट्राव्हीस हेड, ग्लेन मॅक्सवेल, मार्क्युस स्टॉयनीस, मॅथ्यू वाडे, अॅडम झाम्पा.