आपल्या दमदार खेळीनं, नेतृत्वगुणानं 2019 हे वर्ष गाजवणारा टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली 2020मधील आव्हानांसाठी सज्ज झाला आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या कोहलीनं मागील दहा वर्षांन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वतःचे नाणे खणखणीत वाजवले. आता टीम इंडियाच्या सर्व फॉरमॅटमधील संघाचा तो कर्णधार आहे आणि आगामी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप विजयाचा त्याचा निर्धार आहे. नव्या वर्षाच्या आव्हानांचा सामना करण्यापूर्वी कोहलीनं मागील दहा वर्षात काय बदललं, याची प्रचिती देणारा एक गमतीदार फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
कोहलीनं 12 जून 2010मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केले. त्यानंतर कोहलीनं मागे वळून पाहिलेच नाही. कोहलीनं अगदी वेगानं अनेक विक्रमांची शिखरं पादाक्रांत करताना जगातील अव्वल फलंदाज, अव्वल कर्णधाराचा मान पटकावला.दरम्यान, विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया 2020च्या पहिल्याच मालिकेत श्रीलंकेचा सामना करणार आहे. 5 जानेवारीपासून या मालिकेला सुरुवात होत आहे. तीन ट्वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेनंतर टीम इंडियाला घरच्या मैदानावरच बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा वन डे मालिकेत सामना करावा लागणार आहे. त्यानंतर टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. नव वर्षाच्या सुरुवातीला कोहलीनं आपल्या लुकमध्येही बदल केला आहे.
''या दशकाची सुरुवात फ्लिप फ्लॉप ( चप्पल) नं केली आणि आता मी कुठेय!'', असा मजकूर कोहलीनं शेअर केलेल्या फोटोखाली लिहिला आहे.