अनन्या भारद्वाज, मुक्त पत्रकार
आनंदानं साजरं करावं असं दुसरं आमच्या आयुष्यात काय आहे? क्रिकेटच संपलं तर मग उरेल काय? राशिद खान अलीकडेच मुलाखतीत म्हणाला तेव्हा कुणाला खरंही वाटलं नव्हतं की एक दिवस तो आपल्या संघाला उपांत्य फेरीत घेऊन जाईल आणि त्याचा देश वेड्यासारखा आनंदाने रस्त्यावर क्रिकेट साजरं करेल! राशिद खानची ही गोष्ट. वय वर्षे फक्त २५! त्यानं आजवरच्या आयुष्यात काय नाही पाहिलं? तशी सुबत्ता होती त्याच्या कुटुंबात, पण ९/११ च्या हल्ल्यानंतर अफगणिस्तानातलं चित्र बदललं आणि राशिदचे आई- वडील आपली दहा लेकरं घेऊन बॉर्डर क्रॉस करत पाकिस्तानात पेशावरला पोहोचले. त्याचं गाव जलालाबाद सुटलं.
रेफ्यूजी कॅम्पमध्ये ना खाण्यापिण्याची सोय होती ना कसली सुविधा, आपण जिवंत आहोत हीच काय ती उमेद. ही मुलं दिवसभर क्रिकेट खेळायची, आसपास पाकिस्तानी मुलांना खेळताना पाहून तसं खेळायची. शाहिद आफ्रिदी नावाचा खेळाडू राशिद खानचा हिरो होता.
काही वर्षे रेफ्यूजी कॅम्पमध्ये काढली, पुढे राशिदचं कुटुंब जलालाबादला परत आलं. तोवर रेफ्यूजी कॅम्पमधल्या अनेकांनी एकत्र येत अफगाण क्रिकेट टीमचं स्वप्न पाहायला सुरुवात केलीच होती. राशिद शाळेत जायचा, पण दिवसभर क्रिकेटच खेळायचा. वयाच्या फक्त १७ व्या वर्षी तो अफगणिस्तानच्या वन-डे आणि कसोटी सामना संघात पोहोचला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत वयाच्या १९ व्या वर्षी तर तो कप्तानही झाला.
रेफ्यूजी कॅम्पमध्ये राहिलेली ही मुलं अकाली मोठी झाली आणि आपला देश क्रिकेट खेळत जिंकावा अशी स्वप्नही पाहू लागली. राशिदसह अनेक अफगाण खेळाडू कित्येक कोटी रुपये कमवत आयपीएलही गाजवू लागले. दुसरीकडे अनेकजण राशिद खानवर टीका करतात की तो इतका लोकप्रिय आहे तर तालिबानविरोधात बोलत का नाही? महिलांचं शिक्षण, महिला क्रिकेटला विरोध याविषयी बोलत का नाही? नुकतंच एका मुलाखतीत तो म्हणाला, क्रिकेट माझ्यासाठी सर्वस्व आहे. आम्हाला क्रिकेट खेळायला मिळतं, ते खेळून जगभरात आम्ही आमच्या देशाची प्रतिमा बदलतो की नाही माहिती नाही, पण आमच्या माणसांना पराकोटीचा आनंद देऊ शकतो. तसंही आनंद व्हावा असं दुसरं आमच्याकडे काय आहे? न बोलता राशिद असं बरंच काही बोलतो आहे, जिंकून दाखवतोय...