लोणावळा : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा मेणाचा पुतळा भारतातील पहिले वॅक्स म्युझियम असलेल्या लोणावळ्यातील सुनिल सेलिब्रेटी वॅक्स म्युझियममध्ये बनविण्यात आला आहे. सोबतच कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी व विक्रमवीर विराट कोहली यांचेही मेणाचे पुतळे म्युझियममध्ये ठेवण्यात आले आहेत. वॅक्स कलावंत सुनिल कंडलूर यांनी हे पुतळे साकारले आहेत. मुंबईमध्ये एका दिमाखदार सोहळ्यात या पुतळ्यांचे अनावरण करण्यात आले.
जगभरातील क्रिकेट प्रेमींचे प्रमुख आकर्षण असलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा पुतळा लोणावळ्यातील म्युझियममध्ये नागरिकांना पाहण्याकरिता खुला करण्यात आला आहे. केरळ येथील कंडलूर यांनी भारतातील पहिले जागतिक दर्जाचे वॅक्स म्युझियम लोणावळा शहरात सुरू केली आहे. महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह देशभरातील विविध महापुरुषांचे तसेच राजकारणातील प्रमुख मंडळी, सिनेसृष्टीतील कलाकार, नामवंत खेळाडू अशा शंभरहून अधिक सेलिब्रिटींचे हुबेहूब मेणाचे पुतळे या संग्रहालयामध्ये बनवण्यात आले आहेत.