मेलबोर्न : नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेमुळे ड्रेसिंग रूममध्ये नवा उत्साह संचारला, अशी प्रतिक्रिया सोमवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात ८ गडी राखून विजय मिळविल्यानंतर भारताचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने व्यक्त केली. ॲडिलेडमध्ये दिवस-रात्र कसोटीत दुसऱ्या डावात नीचांकी ३६ धावांत बाद झाल्यानंतर आणि कोहली पितृत्व रजेनिमित्त मायदेशी परतल्यानंतर मेलबोर्न क्रिकेट मैदानावर (एमसीजी) भारतीय संघाने रहाणेच्या नेतृत्वाखाली शानदार पुनरागमन केले आणि ८ गडी राखून संस्मरणीय विजय मिळवित मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.
‘७ क्रिकेट’सोबत बोलताना अश्विन म्हणाला, ‘३६ धावांत गारद झाल्यानंतर पुनरागमन करणे सोपे नसते. आम्हाला क्रिकेट देश असल्याचा अभिमान आहे आणि विराटची अनुपस्थिती धक्का होती, पण आम्ही शानदार पुनरागमन केले. ड्रेसिंग रूममध्ये रहाणेने आम्हाला स्थिरता प्रदान केली. ते आवश्यक होते. त्यामुळे आम्हाला या लढतीत सिद्ध करता आले.’
पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवामुळे मालिकेत ०-१ ने पिछाडीवर पडल्यानंतर भारताला आणखी एक धक्का बसला. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमुळे मालिकेतून ‘आऊट’ झाला. रहाणेने दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी ११ व्या षटकातच अश्विनला गोलंदाजीला पाचारण केले आणि त्याचा लाभही मिळाला.