ऑस्ट्रेलिया संघातील स्टार बॅटर स्टीव्ह स्मिथनं तिसऱ्या कसोटी सामन्यातील संयमी खेळीसह अखेर शतकी दुष्काळ संपवला आहे. मागील दीड वर्षात २५ डावात त्याला मोठी खेळी करता आली नव्हती. बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेची सुरुवातीच्या दोन कसोटीत त्याची कामगिरी ढिसाळच राहिली. ऑस्ट्रेलियन संघासाठी हा बॅटर डोकेदुखी ठरत होता. पण तिसऱ्या कसोटीत या पठ्ठ्यानं अखेर आपल्या बॅटिंगचा खास नजराणा पेश करत विक्रमी शतक झळकावलं. कसोटी कारकिर्दीतील ३३ व्या शतकासह त्याने अनेक खास विक्रमाला गवसणी घातली. यात भारतीय संघाविरुद्ध सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत त्याने रिकी पॉन्टिंगला मागे टाकले आहे.
स्मिथनं दीड वर्षाआधी भारताविरुद्धचं झळकावलं होतं अखेरचं शतक
स्टीव्ह स्मिथच्या भात्यातून अखेरचं कसोटी शतक हे जून २०२३ मध्ये आले होते. ही खेळी त्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशिपच्या फायनलमध्ये केली होती. विशेष म्हणजे हा सामनाही त्याने टीम इंडियाविरुद्धच खेळला होता. या शतकी खेळीनंतर सातत्याने तो मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. पण ब्रिस्बेन कसोटीत त्याने १८५ चेंडूत शतक साजरे केले. भारतीय संघाविरुद्ध कसोटीत झळकावलेले हे त्याचे १० वे शतक आहे.
कसोटीत भारताविरुद्ध सर्वाधिक शतकांचा विक्रम
कसोटीत भारतीय संघाविरुद्ध सर्वाधिक शतक झळकवणाऱ्या फलंदाजांच्या यादीत स्मिथ-जो रुट प्रत्येकी १०-१० शतकासह संयुक्तरित्या अव्वलस्थानी आहेत. पण स्मिथनं फक्त ४१ डावात हा पल्ला गाठला आहे. दुसरीकडे जो रुटनं ५५ डावात टीम इंडियाविरुद्ध १० कसोटी शतके झळकावली होती. गॅरी सोबर्स, विव रिचर्ड्स आणि रिकी पॉटिंग या दिग्गजांनी भारताविरुद्ध प्रत्येकी ८-८ कसोटी शतके झळकावली आहेत.
रिकी पॉन्टिंगचा विक्रमही काढला मोडीत
स्टीव्ह स्मिथ याने ब्रिस्बेनमधील शतकी खेळीसह रिकी पॉटिंगचा मोठा विक्रम मागे टाकला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध सर्वाधिक शतके झळकवण्याचा विक्रम आता त्याच्या नावे झालाय. रिकी पॉन्टिंगनं टीम इंडियाविरुद्ध १४ शतके झळकावली होती. स्मिथच्या खात्यात १५ शतकांची नोंद झाली आहे. या यादीत जो रुट १३ शतकांसह तिसऱ्या , विवियन रिचर्ड्स आणि कुमार संगकारा प्रत्येकी ११-११ शतकासह अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत.