मेलबर्न : भारतीय संघाचा सध्याचा फॉर्म पाहता आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्यांच्याकडून ऐतिहासिक कामगिरीची अपेक्षा केली जात आहे. त्यात ऑस्ट्रेलिया संघाची कामगिरी चांगलीच खालावली आहे. त्यांना कसोटी पाठोपाठ ट्वेंटी-20 मालिकेतही पाकिस्तानकडून मानहानिकारक पराभव पत्करावा लागला आहे. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलिया क्रिकेट असोसिएशनने 'विराट'सेनेची धास्ती घेतली आहे.
त्यामुळेच बॉल टेम्परिंग प्रकरणी दोषी असलेल्या स्टीव्ह स्मिथ, डेव्हीड वॉर्नर आणि कॅमेरून बँक्रॉफ्ट यांची शिक्षा रद्द करावी अशी विनंती ते करत आहेत. भारताविरुद्धच्या आगामी मालिकेत ऑस्ट्रेलिया संघात स्मिथ व वॉर्नर यांचे असणे महत्त्वाचे आहे. ही बाब लक्षात घेता ऑस्ट्रेलिया क्रिकेट असोसिएशनने पळापळ सुरू केली आहे. असोसिएशनचे अध्यक्ष ग्रेग डायर यांनी सांगितले की,''या तिघांना त्यांच्या चुकीची पुरेशी शिक्षा मिळालेली आहे. त्यांच्यावरील बंदी हटवायला हवी.''
या प्रकरणाचा तपास करत असलेल्या समितीने खेळाडूंबरोबर क्रिकेट ऑस्ट्रेलियालाही जबाबदार धरल्याचे सांगितले आहे. त्यावरही डायर यांनी नाराजी प्रकट केली. ''खेळाडूंना बरीच शिक्षा मिळालेली आहे. त्यांना लोकांच्या टीकेचाही सामना करावा लागला आहे आणि आर्थिक भुर्दंडही बसला. त्यांना केलेल्या चुकीचा पश्चाताप होत आहे. त्यामुळे त्यांना आता खेळू द्या,'' अशी विनंती डायर यांनी केली आहे.