नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाच्या संघाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथने एक धक्कादायक खुलासा केला आहे. 2022 च्या ट्वेंटी-20 विश्वचषकात कोविड असतानाही अफगाणिस्तानविरूद्धचा सामना खेळला असल्याचे स्मिथने म्हटले आहे. ॲडिलेड येथे झालेल्या सुपर-12 मधील अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यावेळी स्मिथ कोरोना संक्रमित होता. खरं तर ऑस्ट्रेलियन संघ बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारत दौऱ्यावर आला आहे.
ऑस्ट्रेलियन क्रिकेट अवॉर्ड्स दरम्यान स्टीव्ह स्मिथने एक धक्कादायक खुलासा केला. या कार्यक्रमाता बोलताना स्मिथने म्हटले, "मी माझ्या फलंदाजीच्या एवढ्या व्हिडीओ पाहिल्या आहेत की त्याच्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. त्यावेळी भारताविरुद्धच्या घरच्या मालिकेत आणि संपूर्ण विश्वचषकात मी ज्या प्रकारे फलंदाजी करत होतो, तीच माझी ब्लू प्रिंट होती असे मला वाटते. मी ड्रेसिंग रूममध्ये परततो तेव्हा मी खेळपट्टीवर काय करत होतो हे शोधण्याचा प्रयत्न करतो. शेवटी मला समजले आणि तेव्हा मी नेटमध्ये होतो. अफगाणिस्तानविरुद्धच्या ट्वेंटी-20 विश्वचषकाच्या सामन्यापूर्वी मी कदाचित ॲडिलेडमध्ये होतो.
"मला वाटले की आता मला फॉर्ममध्ये येण्याचा मार्ग सापडला आहे, परंतु नंतर मला कोविड झाला. मी अफगाणिस्तानविरूद्धचा सामना कोविड असतानाही खेळलो, पण मला खेळपट्टीवर जास्त वेळ टिकता आले नाही. त्यानंतर मी पुढचा सामना इंग्लंडविरुद्ध खेळला आणि तेव्हा मी जुन्या तंत्राचा विचार केला आणि नाबाद 80 धावा केल्या. माझी खेळण्याची शैली उपखंडातील काही विकेट्ससाठी अनुकूल आहे. मला तिथल्या स्पिनिंग ट्रॅकवर खेळायला खूप मजा येते. तिथे खूप मजा येते आणि तिथे नेहमीच काहीतरी घडत असते. मला वाटते की आम्ही तिथे पोचल्यावर माझ्या सहकाऱ्यांना देखील तेच सांगेन", असे स्टीव्ह स्मिथने अधिक म्हटले.
भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ - पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार, ॲश्टन आगर, स्कॉट बोलंड, ॲलेक्स कॅरी, डेव्हिड वॉर्नर, कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवुड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लायन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वीपसन.
बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेसाठी मास्टरकार्ड ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा नागपुरात 9 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ दिल्ली, धर्मशाला आणि अहमदाबाद येथे तीन कसोटी सामने खेळणार आहे. कसोटी मालिका झाल्यानंतर भारतीय संघाच्या घरच्या मालिकेचा शेवट वन डे मालिकेतून होणार आहे.
ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा
- 9 ते 13 फेब्रुवारी, पहिला कसोटी सामना, नागपूर
- 17 ते 21 फ्रेब्रुवारी, दुसरा कसोटी सामना, दिल्ली
- 1 ते 5 मार्च, तिसरा कसोटी सामना, धर्मशाला
- 9 ते 13 मार्च, चौथा कसोटी सामना, अहमदाबाद
ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत वन डे मालिका
- 17 मार्च, शुक्रवार, पहिला सामना, मुंबई
- 19 मार्च, रविवार, दुसरा सामना, विझाग
- 22 मार्च, बुधवार, तिसरा सामना, चेन्नई
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"