बर्मिंगहॅम, अॅशेस 2019 : एका वर्षानंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या स्टीव्हन स्मिथन अॅशेस कसोटी मालिकेच्या पहिल्याच सामन्यात इंग्लंडचे धाबे दणाणुन सोडले. स्मिथनं दोन्ही डावांत शतकी खेळी करताना ऑस्ट्रेलियाला पहिल्या कसोटीत 251 धावांनी विजय मिळवून दिला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत कांगारुंनी 1-0 अशी आघाडी घेतली. स्मिथन पहिल्या डावात 144 आणि दुसऱ्या डावात 142 धावांची खेळी केली. स्मिथचे हे कसोटी क्रिकेटमधील 25वे शतक ठरले.
पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात शतक झळकावून स्मिथने कसोटी क्रिकेटमधील 25वे शतक पूर्ण केले. त्यानं कोहली आणि पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू इंझमाम उल हक यांच्या 25 कसोटी शतकांशी बरोबरी केली. स्मिथनं 119 डावांत हा पल्ला गाठला आणि कोहलीला मागे टाकले. या विक्रमात सर डॉन ब्रॅडमन 68 डावांसह अव्वल स्थानावर आहेत. कोहली ( 127 डाव), सचिन तेंडुलकर ( 130 डाव ) आणि सुनील गावस्कर ( 138 डाव) हे अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या स्थानावर आहेत.
अॅशेस मालिकेतील स्मिथचे हे दहावे शतक ठरले. या कामगिरीसह स्मिथनं ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉ यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. अॅशेस मालिकेत सर्वाधिक शतकांचा पुरस्कार सर डॉन ब्रॅडमन ( 19) आणि जॅक हॉब्स ( 12) हे आघाडीवर आहेत. याशिवाय इंग्लंडमध्ये पाच किंवा त्यापेक्षा अधिक शतकं करणाऱ्या ब्रॅडमन, वॉ, अॅलन बॉर्डर आणि मार्क टेलर यांच्या पंक्तीत स्थान पटकावले आहे.