वन डे विश्वचषक आता अंतिम टप्प्यात येऊन पोहचला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघांनी उपांत्य फेरीचे तिकिट मिळवले आहे, तर चार संघ अद्याप दोन जागांसाठी मैदानात आहेत. न्यूझीलंड, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान या चार संघांना उपांत्य फेरी गाठण्याची संधी आहे. मंगळवारी अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होणार असून या सामन्याच्या पूर्वसंध्येलाच ऑस्ट्रेलियन संघाला मोठा झटका बसल्याचे दिसते. कारण संघाचा आघाडीचा फलंदाज स्टीव्ह स्मिथची प्रकृती ठिक नसल्याचे कळते. ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
स्मिथने मुंबईत पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मला मागील काही दिवसांपासून चक्कर येत आहे. हे थोडे त्रासदायक आहे, पण आशा आहे की, सराव करू शकेन आणि सर्व काही ठीक होईल. पण यासाठी हे चांगले ठिकाण नाही. मला वाटते की मी ठीक आहे, परंतु मला सध्यातरी चांगले वाटत नाही."
विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ -पॅट कमिन्स (कर्णधार), शॉन अबॉट, ॲलेक्स कॅरी, कॅमेरून ग्रीन, जोश हेझलवुड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लाबूशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस, डेव्हिड वॉर्नर, ॲडम झाम्पा.
'करा किंवा मरा'चा सामनाउपांत्य फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया या दोन्हीही संघांसाठी उद्याचा सामना 'करा किंवा मरा' असा असणार आहे. कारण विजेता संघ उपांत्य फेरीकडे कूच करेल तर पराभूत संघाच्या अडचणीत वाढ होईल. आताच्या घडीला ऑस्ट्रेलियन संघ (१०) गुणांसह तिसऱ्या तर अफगाणिस्तान (८) गुणांसह सहाव्या स्थानावर स्थित आहे.