रांची - एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा 4-0 ने दारुण पराभव केल्यानंतर भारतीय संघ आता टी-20 मालिकेतही विजयी मालिका सुरु ठेवण्याचा प्रयत्न करेल. ऑस्ट्रेलिया मात्र भारताचा विजयी रथ रोखण्याचा प्रयत्न करेल. ऑस्ट्रेलियापुढे तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत भारताला रोखण्याचे आव्हान आहे. दरम्यान ऑस्ट्रेलिया संघाला पहिल्या सामन्याआधीच धक्का बसला आहे. कर्णधार स्टीव्ह स्मिथ जखमी झाला असल्याने टी-20 मालिकेतून बाहेर पडला आहे. खांद्याला दुखापत झाली असल्याने स्टीव्ह स्मिथ बाहेर पडला असून ऑस्ट्रेलियाला परतणार आहे. स्टीव्ह स्मिथच्या जागी ऑल-राऊंडर मार्कस स्टोनिसला संघात जागा देण्यात आली आहे. आधीच आत्मविश्वास ढासळलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला स्टीव्ह स्मिथ बाहेर पडला असल्याने मोठा फटका बसला आहे.
दरम्यान उपचारासाठी स्टीव्ह स्मिथला ऑस्ट्रेलियाला पाठवण्यात येणार आहे. शनिवारी सकाळी ऑस्ट्रेलिया क्रिकेट काऊंन्सिलने हा निर्णय घेतला. स्टीव्ह स्मिथच्या अनुपस्थितीत डेव्हिड वॉर्नर संघाचं नेतृत्व करताना दिसेल. ऑस्ट्रेलिया संघाची फलंदाजी सध्या निराशाजनक असून सर्व जबाबदारी डेव्हिड वॉर्नर, एरॉन फिंच आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथ यांच्या खांद्यावर होती. त्यातच स्टीव्ह स्मिथ संघाबाहेर गेल्याने ऑस्ट्रेलिया संघावरील संकट अजून गडद झालं आहे.
क्रिकेटचे स्वरूप छोटे झाले तर उभय संघांदरम्यानचा फरक काही प्रमाणात कमी होतो. पण, ऑस्ट्रेलियाला फिरकी मारा जोपर्यंत योग्यपद्धतीने खेळता येत नाही तोपर्यंत भारतीय संघ या प्रकारातही वर्चस्व गाजवणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
आशिष नेहराच्या पुनरागमनामुळे आनंद झाला. त्याच्यासह बुमराह भारताचा टी-२० क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाज आहे. डावखुरा नेहरा प्रतिस्पर्धी फलंदाजांपुढे अडचण निर्माण करण्यास सक्षम आहे. पुन्हा एकदा भारतीय फिरकीपटू ऑस्ट्रेलियन फलंदाजांवर वर्चस्व गाजवण्यास सज्ज आहेत. फिरकीपटूंविरुद्ध खेळताना फटक्यांची निवड अचूक असणे महत्त्वाचे ठरते. ऑस्ट्रेलियन खेळाडू त्यात अपयशी ठरत आहेत.
भारतावर वर्चस्व गाजवण्यासाठी ऑस्ट्रेलियाला ग्लेन मॅक्सवेल आणि ट्रॅव्हिस हेड यांच्याकडून चांगल्या कामगिरीची आशा आहे. मार्क्स स्टोनिसमध्ये सुधारणार झाली आहे. अन्य खेळाडू त्याच्याकडून बोध घेतील, अशी ऑस्ट्रेलियन संघव्यवस्थापनाला आशा आहे. ऑस्ट्रेलियन संघ वन-डे मालिकेतील सर्वाधिक यशस्वी गोलंदाज पॅट कमिन्सविना खेळणार आहे. त्याला अॅशेसच्या तयारीसाठी मायदेशी परत धाडण्यात आले. ऑस्ट्रेलियाला उपखंडात खेळलेल्या गेल्या १५ पैकी १४ लढतींमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे.