सिडनी : माजी कसोटीपटू स्टीव्ह वॉ याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने 1999 चा आयसीसी विश्वचषक उंचावला. या विश्वविजेत्या संघातील सदस्य असलेल्या एका खेळाडूने स्टीव्ह वॉ हा सर्वात स्वार्थी खेळाडू असल्याची टीका केली आहे. हा खेळाडू म्हणजे महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्न...''स्टीव्ह वॉ हा सर्वात स्वार्थी खेळाडू आहे. त्याला फलंदाजी करताना 50 ची सरासरी कशी राहील याचीच चिंता असायची,'' असा दावा वॉर्नने त्याच्या आत्मचरित्रात केला आहे. वॉर्नच्या या दाव्याने क्रिकेट वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
वॉर्न याचे 'नो स्पीन' हे आत्मचरित्र लवकरच प्रसिद्ध होणार आहे. चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणानंतर ऑस्ट्रेलिया क्रिकेटची जगभरात प्रतीमा डागाळल्याचा दावा वॉर्नने केला होता. त्यात वॉविरुद्घचा हा दावा आगीत तेल ओतण्यासारखा आहे. वॉर्नने लिहिले आहे की,''कर्णधारपदाची माळ गळ्यात पडल्यानंतर वॉ माणूस म्हणून पूर्णपणे बदलला. त्याने मला संघातून डावलले म्हणून मी असे बोलत नाही. मी चांगली कामगिरी करत नसेन, तर मला संघात राहता येणार नाही. मात्र, तसेही नव्हते. तो माझ्या कामगिरीवर जळत होता. माझ्या शरीराच्या रचनेवरून तो सतत मला चिडवत होता. त्यावेळी मी त्याला तु तुझा विचार कर, असा सल्ला दिला होता.''
वॉर्नला 1999 च्या वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेतून वगळण्यात आले होते. त्याबद्दल वॉर्न म्हणाला,''मी उपकर्णधार होतो आणि चांगली गोलंदाजीही करत होतो. पण, निवड समितीच्या बैठकीत तु पुढील कसोटीत खेळू शकत नाही, असे वॉने मला सांगितले होते."