मेलबर्न : ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि मैदानातील पंच नायजेल लाँग यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये कसोटी मालिका सुरु आहे. या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात हा प्रकार पाहायला मिळाला.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ फलंदाजी करत होता. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर बाद झाला आणि त्यानंतर स्मिथ फलंदाजी आला. यावेळी स्मिथवर न्यूझीलंडच्या खेळाडूंनी बाऊन्सरचा वर्षाव करायला सुरुवात केली. त्यावेळी ही गोष्ट घडल्याचे पाहायला मिळाले.
एका षटकात गोलंदाज दोन बाऊन्सर टाकू शकतो. या सामन्यात न्यूझीलंडच्या नील वँगरने एक बाऊन्सर स्मिथच्या दिशेने टाकला. स्मिथने हा बाऊन्सर आपल्या खांद्याने अडवला आणि तो धाव घेण्यासाठी धावू लागला. स्मिथने धाव पूर्ण केली, पण पंच लाँग यांनी मात्र ही धाव अवैध असल्याचे स्मिथला सांगितले.
जेव्हा पंचांनी स्मिथला ही धाव अवैध असल्याचे सांगितले, ते तो चांगलाच भडकलेला पाहायला मिळाला. स्मिथ आणि पंचांमध्ये यावेळी वाद विवाद झाला. यावेळी स्मिथ ही धाव कशी वैध आहे, हे पंचांना पटवून सांगत होता. पण पंच आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे पाहायला मिळाले. या सर्व प्रकारावर ऑस्ट्रेलियाचा माजी महान खेळाडू शेन वॉर्न चांगलाच भडकल्याचे पाहायला मिळाले.
या सामन्यासाठी वॉर्न हा समालोचन करत होता. जेव्हा हा प्रकार घडला तेव्हा वॉर्न समालोचन कक्षात होता. या सर्व प्रकारावर वॉर्न चांगलाच भडकल्याचे पाहायला मिळाले. यावेळी वॉर्नने पंचांवर सडकून टीका केल्याचे पाहायला मिळाले.
या साऱ्या प्रकाराबाबत वॉर्न म्हणाला की, " माझ्यामते स्मिथचे म्हणणे बरोबर आहे. जेव्हा तुम्ही कोणताही फटका खेळण्याचा प्रयत्न करत नाही तेव्हा तुम्हाला धाव घेता येत नाही. पण जेव्हा चेंडू तुमच्या अंगाला स्पर्श करतो तेव्हा तुम्ही धाव घेऊ शकता. ही गोष्ट पंचांना कोणीतरी सांगायला हवी."