मुंबई : ऑस्ट्रेलियासारख्या दिग्गज संघाचे कर्णधारपद भूषवत असताना चेंडूशी छेडछाड करण्याचे स्टीव्हन स्मिथने केलेले कृत्य हे निंदनीय आहे. त्यामुळे त्याच्यावर आजीवन बंदी घालायला हवी, अशी भूमिका भारताचे माजी क्रिकेटपटू आणि माजी निवड समिती अध्यक्ष संदीप पाटील यांनी घेतली आहे.
या प्रकरणाबाबत पाटील म्हणाले की, " स्मिथ हा एका दिग्गज संघाचा कर्णधार आहे, त्याचबरोबर तो एक चांगला फलंदाजही आहे. त्यामुळे त्याच्याकडून असे कृत्य घडणे योग्य नाही. जर आपल्याला युवा पीढीला चांगला संदेश द्यायचा असेल तर स्मिथवर आजीवन बंदी घालायला हवी. "
इम्रान खानने हे मान्य केले होतेआपण चेंडूशी छेडछाड केली, हे पाकिस्तानचा माजी कर्णधार इम्रान खानने मान्य केले होते. इम्रानने चेंडू हा एका बिल्ल्याने कुरतडला होता. त्यानंतर त्याला चांगले यश मिळाले होते. भारताच्या फलंदाजांना त्याने चांगलेच हैराण केले होते. भारताच्या गोलंदाजांनीही असे करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना ते जमले नाही. कारण हीदेखील एक कला आहे, असे पाटील यांनी सांगितले.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरून बेनक्रॉफ्टने चेंडूशी छेडछाड केली. त्यानंतर ही आमची रणनिती होती, असे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथने जाहीरही केले. चूक मान्य केल्यावरही आयसीसीने स्मिथला एका सामन्यासाठी निलंबित केले आहे. त्याचबरोबर त्याच्या मानधनातील 100 टक्के रक्कम दंड स्वरुपात कापली जाणार आहे.