तारोबा (त्रिनिदाद /टोबेगो) : अष्टपैलू बेन स्टोक्स आणि वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर यांची क्षमता पाहता दोघांना टी-२० विश्वचषकासाठी संघात स्थान मिळणे गरजेचे आहे. जखमांशी झुंज देत असलेले हे दोघेही मॅचविनर असल्याने त्यांना संघात स्थान मिळेल, असे मत प्रशिक्षक मॅथ्यू मोट यांनी व्यक्त केले आहे.
स्टोक्सच्या गुडघ्यावर नोव्हेंबरमध्ये शस्त्रक्रिया पार पडली. तो जानेवारी ते मार्च या कालावधीत होणाऱ्या भारताविरुद्ध मालिकेत नेतृत्व करण्यास फिट होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आर्चर हा ढोपराच्या दुखापतीमुळे मार्चपासून संघाकडून खेळलेला नाही. हे दोघेही फिटनेस मिळविल्यानंतर जून मधील टी-२० विश्वचषकासाठी सज्ज होतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
स्टोक्स आणि आर्चर विश्वचषकाच्या संघ निवडीसाठी उपलब्ध होतील का? या प्रश्नावर मोट म्हणाले,‘ दोघेही संघात असायलाच हवे. मॅचविनर असल्याने दोघांच्या उपस्थितीमुळे संघ संतुलित बनतो. जोफ्राचा वेग फलंदाजांना धडकी भरवतो. तो टी-२० कुठल्याही क्रमांकाचे षटक टाकू शकतो, अगदी अंतिम ओव्हर आणि सुपर ओव्हर देखील! टी-२० विश्वचषक जूनमध्ये वेस्ट इंडीज आणि अमेरिकेच्या संयुक्त यजमानपदाखाली खेळला जाईल. मोट यांनी संकेत दिले की,‘ जोस बटलर आणि फिल सॉल्ट ही सलामीची जोडी टी-२० विश्वचषकात कायम असेल. ही जोडी शानदार ठरत आहे.’