मुंबई - इंडियन प्रीमियर लीगच्या ११ व्या पर्वासाठी खेळाडूंचा लिलाव सुरु झाला असून इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला बंपर लॉटरी लागली आहे. राजस्थान रॉयल्सने तब्बल 12.50 कोटी रुपयात बेन स्टोक्सची खरेदी केली आहे. मागील सत्रात बेन स्टोक्सवर १४ कोटी ५० लाख रुपये इतकी बोली लागली होती. बेन स्टोक्सला विकत घेण्यासाठी किंग्स इलेव्हन पंजाब आणि नाईट रायडर्समध्ये जोरदार प्रयत्न सुरु होते. पण अखेर राजस्थान रॉयल्सने बाजी मारत तब्बल 12.50 कोटी रुपयात बेन स्टोक्सची खरेदी केली. दरम्यान वेस्ट इंडिजचा तुफानी फलंदाज ख्रिस गेलला आपल्या संघात घेण्यात कोणीही रस दाखवला नाही. 2 कोटींची बेस प्राईस असलेल्या ख्रिस गेलवर कुणाचीही बोली लागली नाही. ख्रिस गेल अनसोल्ड राहिल्याने तो यंदा कोणत्याही संघात नसणार आहे. त्यामुळे या हंगामात ख्रिस गेलची तुफानी खेळी पाहण्याची संधी मिळणार नाही.
यंदा ५७८ खेळाडू लिलावात सहभागी होत आहेत. त्यातील ३६१ भारतीय आहेत. भारत आणि जगातील अव्वल १६ खेळाडूंंना एलिट दर्जा बहाल करण्यात आला असून, या खेळाडूंचे आधारमूल्य दोन कोटी इतके आहे. त्यात स्टोक्स, अश्विन, शिखर धवन, मिशेल स्टार्क, ख्रिस गेल आणि ड्वेन ब्राव्हो यांचा समावेश होतो.