अहमदाबाद : युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने कसोटीत अनेकांना प्रभावित केले आहे. इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात गुरुवारी त्याने दोन गडी बाद केले. दिवसअखेर त्याने गोलंदाजी करण्यामागील रणनीतीचा खुलासा केला. याशिवाय बेन स्टोक्सने शेरेबाजी करताना शिवीगाळ केल्याचे तसेच कर्णधार कोहली याने मध्यस्थी करीत सांभाळून घेतल्याचादेखील उल्लेख केला.
सिराज म्हणाला,‘ही खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली आहे. यामुळे संयमाने गोलंदाजी करण्याचा माझा विचार होता.’ भारताने या सामन्यासाठी संघात दोनच वेगवान गोलंदाजांना संधी दिली. सिराजसह ईशांत शर्माला संघात स्थान मिळाले.
‘आम्ही दोन गोलंदाजांसह खेळत असल्याने वारंवार बदल करीत राहू. दोघांनाही विश्रांतीसाठी वेळ मिळावा हा हेतू असेल. याअंतर्गत विराटने मला दुसऱ्या टोकाहून मारा करण्याची देखील संधी दिली,’ असे सिराजने सांगितले. ‘मी प्रत्येक चेंडूवर मेहनत घेतो. चेंडू टाकताना सर्वस्व झोकून देतो. ऑस्ट्रेलिया असो की भारत, मी जेथे मारा करतो तेथे संपूर्ण ताकद पणाला लावतो. ’
विराट आणि स्टोक्स यांच्यात शालेल्या शाब्दिक चकमकीबाबत विचारताच सिराज म्हणाला,‘ बेन स्टोक्सने मला शिवीगाळ करताच मी विराटला सांगितले. त्यानंतर विराट भाईने बाजू सांभाळून घेतली.
कोहली- स्टोक्स पुन्हा भिडले
चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी विराट कोहली आणि बेन स्टोक्स यांच्यात पुन्हा शाब्दिक चकमक झाली. १३ व्या षटकात सिराजने पहिल्या चेंडूवर ज्यो रुटला बाद केले. यानंतर स्टोक्स फलंदाजीला आला. षटक संपल्यानंतर स्टोक्स सिराजला काहीतरी बोलला. थोड्या वेळात ड्रिंक्स काळात कोहली आणि स्टोक्स पुन्हा भिडले. बराच वेळ वाद सुरू असल्याने मैदानी पंच वीरेंद्र शर्मा आणि नितीन मेनन यांनी मध्यस्थी करीत वाद शांत केला. त्यानंतरही स्टोक्सची सिराजविरुद्ध शेरेबाजी सुरुच होती. तिसऱ्या कसोटीतही स्टोक्सने अश्विनविरुद्ध शेरेबाजी केल्यामुळे विराटला हस्तक्षेप करावा लागला होता. २०१६ च्या मोहाली कसोटीतही कोहली आणि स्टोक्स यांच्यात मैदानावर खडाजंगी झाली होती. त्या सामन्यानंतर आयसीसीने कोहलीला झापले होते.
Web Title: 'Stokes insulted me', Siraj complained
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.