मँचेस्टर : पहिला सामना गमावणाऱ्या इंग्लंडने वेस्ट इंडिजविरुद्ध दुस-या कसोटीत झकास सुरुवात केली आहे. पहिल्या दिवशी झटपट तीन गडी गमावल्यानंतर सलामीवीर डोम सिब्ले (११७) आणि मधल्या फळीतील फलंदाज बेन स्टोक्स (१२०) यांनी दमदार खेळी करत डाव सावरला. दोघांनी शतकी धडाका करताच दुस-या दिवशी इंग्लंडला १२३ षटकात ३ बाद ३२४ अशी भक्कम वाटचाल करून दिली. या दोघांनी चौथ्या गड्यासाठी आतापर्यंत १२३ षटकात २३३ धावांची भागीदारी केली आहे.
पहिल्या दिवसअखेर ३ बाद २०७ अशी मजल गाठणाºया इंग्लंडने शुक्रवारी पहिल्या सत्रात एकही गडी गमावला नाही. शांत आणि संयमी खेळी करत ५७ धावांची भर घालत उपाहारापर्यंत ३ बाद २६४ धावा केल्या. उपाहाराआधीच्या षटकात सिब्लेने आपले शतक पूर्ण केले. उपाहारानंतर लगेच स्टोक्सने स्वत:चे दहावे शतक (२५८ चेंडूत १० चौकार, एक षटकार) साकारले. तसेच द्विशतकी भागीदारीही केली. (वृत्तसंस्था)