नवी दिल्ली : ‘भारतात क्रिकेटलाच अधिक महत्त्व मिळत असून, त्याची प्रसिद्धीही अधिक होते. मात्र, आता अन्य खेळांकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. विशेषत: आशियाई स्पर्धेतील यशानंतर अन्य खेळांनाही समान प्राधान्य द्या. क्रिकेटचे कौतुक पुरे झाले, आता आशियाई स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंच्या पाठीवर कौतुकाची थाप द्या,’ असे परखड मत भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर गौतम गंभीरने व्यक्त केले.जकार्ता येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीयांनी ६९ पदके जिंकली. आशियाई स्पर्धेतील भारताची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. यापूर्वी २०१०च्या स्पर्धेत भारताने ६५ पदके जिंकली होती. २०१८च्या आशियाई स्पर्धेत हिमा दास, स्वप्ना बर्मन, बजरंग पुनिया आणि नीरज चोप्रा यांसारख्या अनेक खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी करताना तिरंगा अभिमानाने फडकवला. याच कालावधीत भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर सपाटून मार खात होता. भारताला पाच सामन्यांच्या मालिकेत १-३ अशी हार मानावी लागली.विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाºया भारतीय क्रिकेट संघाला आलेल्या अपयशाने क्रिकेट चाहते दुखावले गेले, तर दुसरीकडे आशियाई स्पर्धेतील अविस्मरणीय कामगिरीने त्यांना आनंदाचे अनेक क्षण लाभले. त्यामुळे क्रिकेटपटूंचे कौतुक पुरे करा आणि अन्य खेळांतील खेळाडूंच्या पाठीवर कौतुकाची थाप द्या, असे गंभीर म्हणाला. त्याने पुढे सांगितले की, ‘आशियाई स्पर्धेतील भारतीय खेळाडूंनी देदीप्यमान यश मिळविले. स्वप्ना बर्मनची कथा पाहा. खरे नायक हे असे घडतात. या देशात क्रिकेट अधिक प्रसिद्ध असल्याने त्याला महत्त्व प्राप्त झाले आहे, असे मला नेहमी वाटते, पण अन्य खेळातही खरेखुरे नायक आहेत.’ (वृत्तसंस्था)
- Cricket Buzz»
- बातम्या»
- क्रिकेटचे कौतुक पुरे, आशियाई पदक विजेत्यांची पाठ थोपटा - गौतमचे ‘गंभीर’ मत
क्रिकेटचे कौतुक पुरे, आशियाई पदक विजेत्यांची पाठ थोपटा - गौतमचे ‘गंभीर’ मत
क्रिकेटचे कौतुक पुरे झाले, आता आशियाई स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंच्या पाठीवर कौतुकाची थाप द्या,’ असे परखड मत भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर गौतम गंभीरने व्यक्त केले.
By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2018 12:25 AM