आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी उद्याचा दिवस हा क्रांतिकारी ठरणार आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये वाया जाणारा वेळ वाचवण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC) Stop clock हा प्रयोग करण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला होता. त्यामुळे वेळ वाचेलही आणि टाईमपास करणाऱ्या संघांवर अंकुशही बसेल. डिसेंबर २०२३ ते एप्रिल २०२४ या कालावधीत वन डे व ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये या नियमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या कालावधीत एकूण ५९ आंतरराष्ट्रीय सामने खेळले जाणार आहेत. वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड यांच्यात उद्या होणाऱ्या पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात सर्वप्रथम स्टॉप वॉच वापरण्यात येणार आहे.
वन डे व ट्वेंटी-२० क्रिकेटच्या नियमातील कलम ४१.९ नुसार क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला वेळेचं भान रहावं यासाठी हा नियम आणला गेला आहे. त्यानुसार क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला एखादे षटक संपल्यानंतर पुढील षटक सुरू करण्यासाठी ६० सेकंदाचा कालावधी दिला जाणार आहे. एक षटक संपल्यावर मैदानावरील स्क्रीनवर टाईमर सुरू केला जाईल. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडून वेळेचं पालन न झाल्यास त्यांना दोन वेळा ताकीद देऊन सोडले जाईल. पण, तिसऱ्यांदा ही चूक झाल्यास फलंदाजी करणाऱ्या संघाला ५ अतिरिक्त धावा दिल्या जातील.
हे घड्याळ केव्हा बंद होईल...
- दोन षटकांच्यामध्ये नवीन फलंदाज फलंदाजीला येत असेल तेव्हा
- अधिकृत ड्रिंक्स ब्रेक घेतला जाईल तेव्हा
- फलंदाज किंवा क्षेत्ररक्षक दुखापतग्रस्त होईल तेव्हा अम्पायरने त्याच्यावरील उपचाराला मान्यता दिली तेव्हा
- क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाची चूक नसताना वेळ वाया जाईल तेव्हा
६० सेकंदाचा कालावधी सुरू करण्याची जबाबदारी तिसऱ्या अम्पायरकडे असणार आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ गोलंदाजी करण्यास तयार असेल, परंतु फलंदाजी करणाऱ्या संघाकडून वेळकाढूपणा सुरू असेल तर अम्पायर त्यांना ताकीद देतील. आयसीसीचे संचालक वसीम खान म्हणाले की, स्टॉक क्लॉक नियमाची निर्धारित वेळेत चाचपणी केली जाईल.