अफगाणिस्तानमध्ये लष्कर आणि तालिबानमध्ये संघर्ष सुरू आहे. तालिबाननं अफगाणिस्तानच्या अनेक बाहेरील भागांमध्ये आपला ताबा मिळवला आहे. तसंच आता तालिबान अनेक प्रातांच्या राजधानींवर ताबा मिळवण्यासाठी पुढे जात आहेत. अफगाणिस्तानात आपलं वर्चस्व स्थापित करण्यासाठी तालिबान निरनिराळ्या भागांमध्ये हल्ले करत आहे. अमेरिकेचं लष्कर माघारी परतण्यास सुरूवात झाल्यानंतर आता स्थिती अधिक बिकट होताना दिसत आहे. अफगाणिस्तानमधील ही परिस्थिती पाहत अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू राशिद खान यानं जागतिक नेतृत्व करणाऱ्या नेत्यांना आवाहन केलं आहे.
अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खाननं एक भावूक ट्वीट केलं आहे. "जगातील नेते मंडळी, माझा देश सध्या कठीण काळातून जात आहे. हजारो निष्पाप लोक ज्यात, मुलं, महिला आहेत त्यांचे जीव जात आहेत. अनेक कुटुंबांना आपलं घरही सोडावं लागलं. अनेक घरं, संपत्ती नष्ट करण्यात आल्या.या संकटात आम्हाला सोडून जाऊ नका असं तुम्हाला आवाहन आहे. अफगाणिस्तानमधील लोकांना मारणं बंद करा, आम्हाला शांतता हवी आहे," असं राशिद खान म्हणाला.