अयाज मेमन, कन्सल्टिंग एडिटर -
विराट कोहलीने टी-२० विश्वचषकानंतर कर्णधारपद सोडण्याचा घेतला निर्णय अनपेक्षित नव्हताच. घोषणेची वेळ मात्र आश्चर्यचकित करणारी ठरली. कोहलीच्या नेतृत्वात आयसीसी स्पर्धेत जेतेपद मिळण्यात अपयश येत असल्यावरून अनेक महिन्यांपासून कोहली आणि बीसीसीआय यांच्यात बिनसले होते. कोहलीला आयसीसी स्पर्धा जिंकण्यात आलेले अपयश, स्वत:चा खराब फॉर्म तसेच संघातील सहकारी आणि व्यवस्थापनाशी बिघडलेले संबंध ही नेतृत्व सोडण्यामागील कारणे मानता येतील.
अयपीएल आणि विश्वचषक जवळ येताच कोहलीने स्वत:हून पुढाकार घेतला. मीडियाने या वृत्तांना बळ दिले तेव्हा बीसीसीआय पदाधिकाऱ्यांनी सर्वकाही योग्य असल्याचे सांगून मुद्दा बाजूला सारण्याचा प्रयत्न केला. कोहलीने ‘वर्कलोड’चे कारण देत स्वत:साठी ‘स्पेस’ हवी असे म्हटले, तर दुसरीकडे बीसीसीआय सचिव आणि कोषाध्यक्ष यांच्यातील संभाषणावरून संघाची कामगिरी उंचावण्यासाठीच मागच्या सहा महिन्यांपासून नेतृत्वाचा मुद्दा ऐरणीवर असल्याचे स्पष्ट झाले.
तीनही प्रकारात ५० च्या सरासरीने धावा काढणारा फलंदाज अशी ख्याती असलेल्या विराटच्या बॅटमधून गेल्या दोन वर्षांत धावांचा वेग मंदावला. एक फलंदाज म्हणून विराट महान फलंदाज असला तरी बीसीसीआयला कोहलीच्या फॉर्मची नव्हे, तर त्याच्या नेतृत्वातील अपयशाची चिंता अधिक होती. कर्णधारपद ही मोठी जबाबदारी आहे. आणखी ७-८ सामन्यांतील अपयशाची भर पडली असती तरी परिस्थिती कोहलीच्या हाताबाहेर जाण्याची दाट शक्यता होती.विराट हा महान फलंदाजांमध्ये येतो. टी-२० कर्णधारपद सोडण्याचा त्याला फलंदाजीत लाभ झाला तरी संघासाठी व स्वत:साठी फायदेशीर ठरेल. विश्वचषकाला अद्याप वेळ असल्याने विराटने घोषणा करून बीसीसीआयसाठी मार्ग मोकळा केला, हे बरेच झाले.
लाल चेंडू आणि पांढऱ्या चेंडूंच्या सामन्यांसाठी वेगवेगळे कर्णधार हवे, अशी नेहमी चर्चा होते. कोहलीकडून वन-डे कर्णधारपदही काढून घेतले जाईल का, हे बीसीसीआयवर विसंबून असेल.
असे झाल्यास कोहलीने सभोवताली निर्माण केलेली यंत्रणा हळूहळू खच्ची केली जात आहे, हा यामागील अर्थ असावा. पुढील वन-डे संघ जेव्हा जाहीर होईल, त्यावेळी या रहस्याचे उत्तर मिळणारच आहे...
- टी-२० विश्वचषकासाठी संघाच्या मेंटरपदी महेंद्रसिंग धोनी याची नियुक्ती झाली तेव्हाच आतमध्ये काही शिजत असल्याची कुजबुज लागली होती. हे करताना कोहली आणि शास्त्री यांच्याशी धोनीच्या चांगल्या संबंधांचा हवाला देण्यात आला. मात्र, दुसरीकडे कोहलीच्या नेतृत्वावर विश्वास नसल्याचा ‘मास्टरस्ट्रोक’ देखील लगावण्यात आला होता.
- टी-२०त कोहलीची विजयी टक्केवारी धोनीच्या तुलनेत सरस आहे; पण यापैकी बरेच विजय द्विपक्षीय मालिकेत आहेत. धोनीने २००७ चा टी-२० विश्वचषक, २०११ चा वन डे विश्वचषक आणि २०१३ ला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिली. कोहली मात्र आयपीएलमध्ये आरसीबीसाठी अद्याप पहिले जेतेपद पटकावू शकलेला नाही.
- धोनीने तीनदा, रोहितने पाचवेळा आयपीएल जेतेपदाची किमया साधली. कोहलीच्या नेतृत्वात २०१९ च्या आयसीसी वन-डे विश्वचषकात उपांत्य सामना गमावल्यापासूनच ही तुलना सुरू झाली होती. त्यातच डब्ल्यूटीसीचे पहिले जेतेपद पटकाविण्याची संधी देखील विराटने गमावली. यामुळे कोहलीवर दडपण वाढतच गेले.