बिहार क्रिकेट संघटनेने क्रिकेटपटू लखन राजा याच्यावर कठोर कारवाई केली आहे. बिहार विरुद्ध मुंबई यांच्यात झालेल्या रणजी करंडक सामन्यापूर्वी वडील आदित्य प्रकाश वर्मा यांच्यासोबत संघटनेच्या विरोधी कारवायांमध्ये सहभागी झाल्याच्या आरोपाखाली लखन राजा याला सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. ५ जानेवारी रोजी मुंबईविरुद्ध झालेल्या रणजी करंडक सामन्यासाठी बीसीएचे माजी सचिव अमित कुमार यांनी एक वेगळा संघ जाहीर केला होता. त्याला बीसीएने मान्यता दिली नव्हती.
या घटनेनंतर बीसीएकडून मान्यता देण्यात न आलेल्या खेळाडूंच्या दुसऱ्या यादीत समाविष्ट असलेल्या सर्व खेळाडूंनाआणि सपोर्ट स्टाफला संघटनाविरोधी कारवाईमध्ये सहभागी झाल्यामुळे कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आली होती. त्या नोटिशीवर पुढील कारवाई करताना बिहार क्रिकेट संघटनेने लखन राजा याला निलंबित केले आहे. लखन राजा हा त्याचे वडील आदित्य प्रकाश वर्मा आणि माजी सचिव अमित कुमार यांच्यासोबत संघटनाविरोधी कारवाईमध्ये सहभागी असल्याचे दिसून आले होते.
बिहार क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष राकेश तिवारी यांनी सांगितले की, बीसीए व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी दिलेल्या सूचनांचं पालन न करता लखन राजा हा वडील आदित्य प्रकाश वर्मा यांच्यासोबत शिस्तभंग आणि संघविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाला होता. दरम्यान, बिहार क्रिकेट असोसिएशनने याबाबत सांगितलं की, ४ जानेवारी २०२४ रोजी मोइन उल हक स्टेडियममध्ये झालेल्या घटनेमध्ये सहभागी झाल्यामुळे लखन राजा याला बिहार क्रिकेट संघटनेमधून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. आम्ही क्रिकेटमधील खेलभावनेविरोधातील कुठलंही वर्तन किंवा कृती सहन करणार नाही. यामध्ये सहभागी असलेल्या लोकांना निलंबित करून आम्ही बिहार क्रिकेटला निष्पक्ष आणि एकजूट ठेवण्यासाठी भक्कमपणे उभे आहोत. आम्ही बिहारमध्ये खेळाची अखंडता कायम ठेवण्यासाठी कटिबद्ध आहोत.