सिंगापूर : जगभरात वेगाने वाढत असलेले टी-१० आणि टी-२० क्रिकेटचे पीक रोखण्यासाठी आणखी कठोर नियम करण्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने योजना आखली आहे.
यासंदर्भात मंथन करण्यासाठी मंगळवारपासून बैठक सत्र सुरू होत असून, करडी नजर राखण्याचे उपाय शोधले जातील. पाच दिवसांच्या बैठकीत २०१९ च्या विश्वचषकानंतर आयोजित पहिल्या विश्व कसोटी चॅम्पियनशिपवरही चर्चा होईल.
आयसीसीच्या अनेक सदस्य देशांनी आयपीएलला लाभलेले अभूतपूर्व यश पाहून स्वत:ची टी-२० लीग सुरू केली. अफगाणिस्तानने तर स्वत:च्या टी-२० लीगसाठी यूएईची निवड केली. दरम्यान, मागच्या वर्षी आयसीसीने टी-१० क्रिकेटला मंजुरी प्रदान केली. या प्रकारातील लीगवर आळा घालण्यासाठी आयसीसी विशेष प्रयत्न करणार आहे.
अशाप्रकारच्या लीगची वाढती संख्या जोखिमेची ठरू शकते, अशी भीती आयसीसीचे क्रिकेट महाव्यवस्थापक ज्योफ एलार्डिस यांनी बैठकीपूर्वी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘आम्ही बैठकीत स्पर्धेतील नियम आणि प्रतिबंध तसेच लीगसाठी खेळाडूंना मोकळे करण्याच्या मुद्यावर चर्चा करणार असून, लीगमध्ये मालकी हक्क कसा असावा, लीगमधील आर्थिकव्यवस्था कशी असेल, यावर तोडगा शोधला जाईल.’
प्रत्येकासाठी आमची दारे उघडी असणार नाहीत. अशा स्पर्धा सुरू करण्यासाठी स्थानिक बोर्ड आणि आयसीसी या दोहोंची मान्यता घ्यावी लागेल. यापुढे टी-२० लीगला आयसीसीकडून मान्यता मिळणे कठीण होईल, असे संकेतही एलार्डिस यांनी दिले.
आयसीसीच्या पहिल्या महिला संचालक म्हणून एका आघाडीच्या कंपनीच्या माजी सीईओ इंद्रा नुयी प्रथमच बैठकीत सहभागी होतील. भारताचे प्रतिनिधित्व काळजीवाहू सचिव अमिताभ चौधरी करणार आहेत. लैंगिक अत्याचाराच्या आरोपात अकडलेले सीईओ राहुल जोहरी यांना मात्र बैठकीतून नाव मागे घ्यावे लागले आहे. (वृत्तसंस्था)
उमेश यादव आला ‘पंचविशीत’वेस्ट इंडिजविरुद्ध २-० ने विजयाचा लाभ भारतीय संघ आणि कर्णधार विराट कोहलीला जितका झाला तितकाच तो वेगवान गोलंदाज उमेश यादव याला झाला. दुसऱ्या सामन्यात दहा गडी बाद करणाºया उमेशला आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत २९ वरून २५ वे स्थान मिळाले.विराट कोहली नंबर वन फलंदाज म्हणून कायम आहे. भारतात दहा गडी बाद करणाºया भारतीय गोलंदाजांत उमेशचे तिसरे स्थान आहे.१९ वर्षांखालील विश्वचषक जिंकून देणाऱया शॉ ला शानदार कसोटी पदार्पणाचा मोठा लाभ असून तो ६० व्या स्थानावर पोहोचला. त्याआधी शॉ ने पदार्पणी सामन्यात शतक ठोकून सुरुवातीलाच ७३ वे स्थान मिळविले होते.यष्टिरक्षक- फलंदाज ऋषभ पंत याने ९२ धावांच्या बळावर २३ स्थानांची झेप घेत ६२ वे स्थान मिळविले. दिल्लीचा हा खेळाडू मालिका सुरू होण्याआधी १११ व्या स्थानी होता. राजकोट येथेही त्याने ९२ धावा ठोकल्या होत्या. अजिंक्य रहाणे यानेही ८० धावांच्या जोरावर चार स्थानांची झेप घेत १८ वे स्थान गाठले.विंडीज कर्णधार जेसन होल्डरने चांगली कामगिरी केली. पहिल्या डावात ५६ धावांत पाच गडी बाद करणारा जेसन करियरमधील सर्वोत्कृष्ट नवव्या स्थानावर पोहोचला. फलंदाजीतही त्याला तीन स्थानांचा लाभ झाला असून ५३ वे स्थान मिळाले.