- अयाज मेमन(कन्सल्टिंग एडिटर)
ईडन गार्डनवरील भारत वि. दक्षिण आफ्रिका या सामन्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. भारत आधीच उपांत्य फेरीत दाखल झाला असून, दक्षिण आफ्रिकेचेदेखील १२ गुण असल्याने गणिताच्या भाषेत सांगायचे तर या दोन संघांशिवाय उपांत्य फेरीआधी सुरुवातीच्या दोन स्थानांवर अन्य कुणी विराजमान होऊ शकेल असे वाटत नाही.
आजचा सामना फायनलमध्ये दोन्ही संघ आमने-सामने येण्याआधीची रंगीत तालीमदेखील ठरू शकतो. दुसरा पैलू असा की, दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज भारतीय फलंदाजांपुढे किती प्रगल्भतेने मारा करतात, यावर सामन्याचा निकाल ठरणार आहे. कॅगिसो रबाडा, मार्को यान्सेन, लुंगी एन्गिडी आणि गेरॉल्ड कोएत्झी यांचा मारा अतिशय भेदक आहे. केशव महाराज आणि तबरेज शम्सी यांची फिरकी देखील निर्णायक ठरण्याची शक्यता नाकारता येणार नाही. ही ना सेमीफायनल आहे, ना फायनल; पण अशी लढत आहे की, ज्याद्वारे कोणता संघ चषक उंचावू शकतो, असे संकेत मिळू शकतील.
‘ईडन’वर नेहमी चैतन्यमय वातावरणात सामने खेळले जातात. भारतीय संघाला येथे भरपूर पाठिंबा लाभतो. या स्पर्धेत भारताने कामगिरीत सातत्य राखले ही सर्वांत मोठी बाब म्हणावी लागेल. द. आफ्रिकेने एक सामना गमावला. हा संघ प्रथम फलंदाजी करताना फारच बलाढ्य जाणवला; मात्र लक्ष्याचा पाठलाग करताना त्यांचे फलंदाज थोडेसे ढेपाळले होते. भारताने आज फलंदाजी घेत मोठ्या धावा उभारल्यास हा संघ लक्ष्याचा पाठलाग कसा करेल? दडपण झुगारू शकेल का? हेदेखील पाहावे लागेल. मानसिकदृष्ट्या त्यांची किती तयारी आहे, हे त्यांच्या कामगिरीद्वारे सिद्ध होईल.
आजच्या लढतीद्वारे दोन्ही संघ एकमेकांची बलस्थाने आणि कच्चे दुवे जाणून घेण्याचा प्रयत्न करतील. भारताने आतापर्यंत अष्टपैलू कामगिरीचे दर्शन घडविले. रोहित आणि विराट संघाच्या विजयाचा पाया रचून देत आहेत. राहुल, श्रेयस, जडेजा, सूर्या हेदेखील फॉर्ममध्ये आहेत; पण मी गोलंदाजांकडे अधिक आश्वासक नजरेने बघतो. डिकॉक, बावुमा, मार्कराम, मिलर आणि हेन्रीच क्लासेन यांच्यापुढे भारतीय गोलंदाज कसा मारा करतील, हे पाहावे लागेल. दोन्ही संघांसाठी हाच या सामन्याचा महत्त्वपूर्ण पैलू असणार आहे.