Mohd Amman Under 19 : भारताच्या अंडर-१९ वन डे संघाच्या कर्णधारपदी अलीकडेच मोहम्मद अमानची निवड झाली. तो मूळचा उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील आहे. सहारनपूरचा रहिवासी असलेला अमान हा अत्यंत गरिबीतून पुढे आला. अमानच्या आईचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्याच्या वडिलांचेही २०२२ मध्ये निधन झाले. त्याचे वडील ट्रकचालक होते. आपला संघर्षमय प्रवास सांगताना अमान भावुक झाला. मोहम्मद अमानच्या नेतृत्वातील भारतीय संघात माजी खेळाडू राहुल द्रविडच्याही मुलाचा समावेश आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया अंडर १९ संघामध्ये होणारी मालिका २१ सप्टेंबरपासून रंगणार आहे. या मालिकेत ३ वनडे सामन्यासह २ चार दिवसीय सामन्यांचा समावेश आहे.
मोहम्मद अमान सांगतो की, मी माझ्या परिचयाच्या लोकांना विनंती केली होती की, मला कोणीतरी काम द्या. त्यामुळे मी माझ्या भावंडांचे संगोपन करू शकेन. माझा लहान भाऊ मजूरी करत असे. पैशावरून आई आणि वडिलांमध्ये भांडण व्हायचे. म्हणून मी माझ्या आईला सांगितले होते की, मी माझी क्रिकेट किट विकणार आहे आणि त्यातून मिळणाऱ्या पैशांचा वापर कर. घरी पैसे नसल्याने मॅचसाठी जाणे कठीण व्हायचे. माझा प्रवास आणि खेळी व्हीव्हीएस लक्ष्मण सरांनी पाहिली मग नवी इनिंग सुरू झाली.
आपल्या आवडत्या खेळाडूबद्दल बोलताना अमान म्हणाला की, माझा आवडता क्रिकेटर एबी डिव्हिलियर्स हा आहे आणि महेंद्रसिंग धोनी आवडता कर्णधार आहे. अमान एबीपी या हिंदी वृत्तवाहिनीशी बोलत होता. खरे तर १९ वर्षाखालील भारतीय संघ २१, २३ आणि २६ सप्टेंबरला पुडुचेरीच्या मैदानात ऑस्ट्रेलियन अंडर १९ संघाविरुद्ध तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यानंतर ३० सप्टेंबर आणि ७ ऑक्टोबरला या दोन्ही संघात २ दिवसीय सामने नियोजित आहेत.
भारतीय संघ -मोहम्मद अमान (कर्णधार), रुद्र पटेल (उपकर्णधार), साहिल पारख, कार्तिकेय केपी, किरण चोरमले, अभिज्ञान कुंडू, हरवंश सिंह पंगालिया, समित द्रविड, युद्धजीत गुहा, समर्थ एन, निखिल कुमार, चेतन शर्मा, हार्दिक राज, रोहित राज अवत, मोहम्मद एनान.