पुणे : पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवानंतर दबावात आलेल्या भारतीय संघावर दुसरा एकदिवसीय सामना जिंकून मालिका वाचवण्याचा दबाव राहणार आहे. गहुंजे येथील एमसीएच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानावर होणा-या या दुस-या लढतीत मालिकेत कायम राहण्यासाठी विराटसेनेला कोणत्याही परिस्थितीत बुधवारचा सामना जिंकावाच लागेल. मागच्या सहा द्विपक्षीय मालिकांमध्ये विजय मिळवलेल्या भारतीय संघाला मायदेशी अशा परिस्थितीचा सामना फार कमी वेळा करावा लागतो. जेव्हा मालिकेत कायम राहण्यासाठी त्यांना करा किंवा मरा असा सामना खेळावा लागतो.
मुंबईत झालेल्या सामन्यात भारतीय संघ विजयाचा दावेदार म्हणून उतरला होता. मात्र रॉस टेलर आणि टॉम लॅथम यांच्या विक्रमी भागीदारीने भारतीय संघाला अडचणीत आणले. आॅस्ट्रेलियाला अडचणीत आणणाºया चहल आणि कुलदीप यादव या फिरकी जोडीला या दोन्ही फलंदाजांनी मोठ्या आरामात तोंड दिले. यजमान संघ मुंबईच्या सामन्यात चांगल्या फॉर्ममध्ये दिसला नाही. मात्र उद्याच्या सामन्यात ही परिस्थिती बदलू शकते. विराट कोहली याने मागील सामन्यात शतकी खेळी केली होती. मात्र त्याला इतर फलंदाजांची फारशी साथ मिळाली नाही. सलामीवीर शिखर धवन आणि रोहित शर्मा यांना बोल्ट याने तंबूत पाठवले होते. कर्णधार विराट कोहलीला आपल्या लयीत कायम राहावे लागेल. मोठी धावसंख्या उभारण्यासाठी त्याने धावा करणे गरजेचे आहे.
कोहलीने जानेवारीत या मैदानात मॅचविनिंग खेळी केली होती. चौथे स्थान हे भारतीय फलंदाजीसाठी आव्हान ठरले आहे. २०१५ च्या विश्वचषकानंतर भारताने ११ खेळाडूंना या स्थानावर खेळवले आहे. मात्र अजूनही योग्य पर्याय मिळालेला नाही. मुंबईत भारताने केदार जाधवला या स्थानावर उतरवले होते. मात्र तो अपयशी ठरला.
पाचव्या क्रमांकावर आलेल्या दिनेश कार्तिक याने कोहलीसोबत ७३ धावांची भागीदारी केली. महेंद्रसिंह धोनी याने ४२ चेंडूंत २५ धावा केल्या. गरजेच्या वेळी तो अपयशी ठरला. गोलंदाजीत चहल आणि यादव यांच्याकडून बदलाची अपेक्षा आहे. दोघांनी १२५ धावा देत फक्त एकच गडी बाद केला होता. लॅथम आणि टेलर यांना स्वीप आणि रिव्हर्स शॉट खेळण्यापासून रोखावे लागेल.
जलदगती गोलंदाजीकडून बदलाची अपेक्षा नाही. पहिल्या सामन्यातील शानदार विजयानंतर न्यूझीलंड विजयाचा दावेदार म्हणून उतरेल. कर्णधार केन विल्यम्सन याने सराव आणि पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी करू शकला नाही. गुप्टिल आणि मुन्रो हे चांगल्या सुरुवातीला मोठ्या परिस्थितीत
बदलू शकले नाहीत. मात्र पाहुुणा
संघ या चुकांमधून सुधारणा
करेल. तसेच इश सोढीच्या रुपाने दुसरा फिरकी गोलंदाजदेखील खेळवू शकतो.
>संघ
भारत - विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, मनीष पांडे, केदार जाधव, दिनेश कार्तिक, एम. एस. धोनी, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि शार्दुल ठाकूर.
न्यूझीलंड - केन विल्यम्सन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, कॉलिन डी ग्रॅण्ड होम, मार्टिन गुप्टिल, मैट हेन्री, टॉम लॅथम, हेन्री निकोल्स, अॅडम मिल्ने, कॉलिन मुन्रो, ग्लेन फिलिप्स, मिशेल सँटेनर, टीम साऊदी, रॉस टेलर, जॉर्ज वर्कर, ईश सोढी.
Web Title: Struggling to maintain prestige, India to challenge; The determination of the Kiwis series to win
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.