Stuart Broad on Team India: ऑक्टोबरचा महिना उजाडताच क्रिकेट चाहत्यांना वन डे वर्ल्डकपचे वेध लागले आहेत. ODI World Cup 2023 स्पर्धेतील सराव सामने पावसाने उधळून लावले असले तरी मूळ वर्ल्डकप ५ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेत भारताचा सलामीचा सामना ८ ऑक्टोबरला तुल्यबळ ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. या सामन्यासाठी आणि संपूर्ण स्पर्धेसाठी भारतीय संघाने जोरदार तयारी केल्याचे दिसत आहे. या स्पर्धेत भारतीय संघ मायदेशात खेळणार असल्याने त्यांच्या Home Advantage म्हणजेच घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा मिळणार आहे. अशा वेळी भारतीय संघाला स्पर्धा जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. केवळ भारतीय चाहतेच नव्हे तर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड यालाही या स्पर्धेसाठी भारतीय संघच दावेदार वाटत आहे. भारतीय संघाला या स्पर्धेत कुणीही रोखू शकत नाही, असे त्याने म्हटले आहे.
नक्की काय म्हणाला स्टुअर्ट ब्रॉड?
"इंग्लंडचा संघ हा गतविजेता आहे. त्यामुळे त्यांनी जर आपले विश्वविजेतेपद कायम राखण्यात यश मिळवले तर ही त्यांच्यासाठी एक अविश्वसनीय कामगिरी ठरू शकेल. पण सध्या माझं मन मला सांगतंय की जर भारतीय संघाने या स्पर्धेत प्लॅनिंग करून त्यानुसार योग्य खेळ केला तर टीम इंडियाला रोखणं कोणत्याही संघासाठी निव्वळ अशक्य आहे. भारतीय पिचवर मोठ्या धावसंख्या उभारल्या जातात. अशा परिस्थितीत जोस बटलरच्या नेतृत्वाखालील संघापुढे मोठं आव्हान असणार आहे. पण त्यातही भारतीय संघ हा सध्या वन डे क्रमवारीत अव्वल आहे आणि मायदेशात खेळणार आहे. त्यामुळे त्यांच्या संघाविरोधात योजना आखणे खूपच कठीण जाईल," असे ब्रॉड म्हणाला.
"२०११ पासून एक गोष्ट सातत्याने दिसून आली आहे की जो संघ यजमान असतो त्या संघाला विश्वविजेतेपद मिळते. २०११ मध्ये भारताने भारतात वर्ल्ड कप जिंकला. २०१५ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने ऑस्ट्रेलियात वर्ल्ड कप जिंकला. इंग्लंडने २०१९ ला इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप जिंकला. आता ही परंपरा कायम राखली जाऊ शकते. अशा वेळी भारतीय संघ हा अतिशय प्रबळ दावेदार आहे," असे मत स्टुअर्ट ब्रॉडने व्यक्त केले.