IND A vs NZ A : भारताची युवा ब्रिगेड आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये छाप पाडण्यासाठी सज्ज झाली आहे. भारत अ आणि न्यूझीलंड अ यांच्यातल्या सामन्यात रजत पाटीदार ( Rajat Patidar), अभिमन्यू इश्वरन ( Abhimanyu Easwaran) व तिलक वर्मा ( Tilak Varma) यांनी न्यूझीलंडच्या ४०० धावांच्या प्रत्युत्तरात तिसऱ्या दिवसअखेर ४ बाद ४९२ धावांचा डोंगर उभा केला. भारताकडे ९२ धावांची आघाडी आहे.
आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) कडून खेळणाऱ्या रजतने आयपीएल २०२२च्या एलिमिनेटर सामन्यात शतक झळकावले, रणजी फायनलमध्ये त्याने शतक झळकावून मध्य प्रदेशच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला अन् आज भारत अ कडून पदार्पणात १७० धावांची खेळी करून टीम इंडियाचे दार ठोठावले.
न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ४०० धावांचा डोंगर उभा केला. जोए कार्टरने एकट्याने ३०५ चेंडूंत २६ चौकार व ३ षटकारांसह १९७ धावांची खेळी केली. ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. भारत अ कडून पदार्पण करणाऱ्या मुकेश कुमारने ८६ धावा देताना ५ विकेट्स घेतल्या. एस एन खानने दोन, यश दयाल, ए नागवास्वाला व कुलदीप यादव यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. प्रत्युत्तरात कर्णधार प्रियांक पांचाल व अभिमन्यू इश्वरन यांनी पहिल्या विकेटसाठी १२३ धावा जोडल्या. पांचाल ४७ धावांवर बाद झाला. ऋतुराज गायकवाड २१ धावांवर माघारी परतल्यानंतर रजत पाटीदार व अभिमन्यू यांनी शतकी भागीदारी केली.
अभिमन्यू १९४ चेंडूंत १३ चौकार व १ षटकारांसह १३२ धावांत माघारी परतला. सर्फराज खानने ३६ धावा केल्या. रजत व तिलक वर्मा यांनी पाचव्या विकेटसाठी जोरदार फटकेबाजी केली. ४ बाद ३२५ धावांवरून त्यांनी भारताला दिवसअखेर ४ बाद ४९२ धावांपर्यंत मजल मारून दिली. रजतने २४१ चेंडूंत १४ चौकार व ४ षटकारांसह नाबाद १७० धावा केल्या, तर तिलकने ५ चौकार व ५ षटकारांसह नाबाद ८२ धावा चोपल्या.
Web Title: Stumps Day 3: India A - 492/4 in 123.6 overs, Rajat Patidar - 170*(241), Abhimanyu Easwaran - 132(194) & Tilak Varma - 82*(132) against New Zealand A
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.