Ashes, AUS vs ENG, 4th Test : ऑस्ट्रेलियानं अॅशेस मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. चौथ्या कसोटीतही यजमान ऑस्ट्रेलियानं इंग्लंडला बॅकफूटवर फेकलेले पाहायला मिळतेय. सिडनी कसोटीच्या चौथ्या दिवशी इंग्लंडनं बिनबाद ३० धावा केल्या आहेत आणि पाचव्या दिवशी त्यांना विजयासाठी आणखी ३५८ धावा करायच्या आहेत. पहिल्या डावातील शतकवीर उस्मान ख्वाजानं दुसऱ्या डावातही नाबाद १०१ धावा करून ऑस्ट्रेलियाला मोठा पल्ला गाठून दिला. पण, या सामन्यात ऑसी कर्णधार पॅट कमिन्स याच्या डाव घोषित करण्याच्या वेळेवर सवाल उपस्थित केले जात आहेत. इंग्लंडचा गोलंदाज जॅक लीच ( Jack Leach) हा हॅटट्रिकवर असताना कमिन्सनं डाव घोषित केला. त्यामुळे ऑसी कर्णधाराच्या खिलाडूवृत्तीवर सवाल उपस्थित होत आहेत.
ऑस्ट्रेलियानं पहिला डाव ८ बाद ४१६ धावांवर घोषित केल्यानंतर इंग्लंडनं २९४ धावा केल्या. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजानं शतक झळकावले. त्याच्या नाबाद १०१ धावा आणि कॅमेरून ग्रीनच्या ७४ धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं २६५ धावांपर्यंत मजल मारली. ६९व्या षटकात जॅक लीचनं चौथ्या व पाचव्या चेंडूवर अनुक्रमे ग्रीन व अॅलेक्स केरी यांना माघारी पाठवले. तो हॅटट्रिकवर असताना कमिन्सनं डाव घोषित केला अन् लीच हॅटट्रिक घेण्यापासून वंचित राहिला. ऑस्ट्रेलियानं दुसरा डाव ६ बाद २६५ धावांवर घोषित केला.लीचनं या डावात ४ विकेट्स घेतल्या, तर मार्क वूडनं २ बळी टीपले.
ऑस्ट्रेलियानं विजयासाठी ३८८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. इंग्लंडनं चौथ्या दिवसअखेर बिनबाद ३० धावा केल्या आहेत. झॅक क्रॅवली २२, तर हसीब हमदा ८ धावांवर खेळत आहेत. इंग्लंडला विजयासाठी ३५८, तर ऑस्ट्रेलियाला १० विकेट्सची गरज आहे.
उस्मान ख्वाजाचा विक्रमअॅशेस मालिकेत तब्बल २५ वर्षांनंतर पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाने दोन्ही डावात शतक झळकावले. याआधी स्टीव्ह वॉ याने अशी कामगिरी केली होती. आणखी एक बाब म्हणजे, ख्वाजाने सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर यांचाही विक्रम मोडला. आशिया खंडात जन्म झालेल्या क्रिकेटपटूंपैकी ऑस्ट्रेलियात सर्वाधिक कसोटी शतक ठोकणाऱ्यांच्या यादीत उस्मान ख्वाजाने साऱ्यांनाच मागे टाकलं. ख्वाजाच्या नावे आता ऑस्ट्रेलियात ८ शतके आहेत. तर सचिन आणि विराटच्या नावे प्रत्येकी ६ आणि सुनील गावसकर यांच्या नावे ५ शतके आहेत.