Join us  

यशाचा शिल्पकार

एक खेळाडू म्हणून अजित अप्रतिमच होता. तो संघासाठी झोकून देत असे. संघाला ज्या खेळाची आवश्यकता असायची, तशीच त्याची खेळी होती.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 4:53 AM

Open in App

- चंदू बोर्डेअजित आणि माझी खूप चांगली मैत्री होती. १५ आॅगस्टच्या रात्री ११च्या सुमारास अजित वाडेकरच्या निधनाची बातमी कळाली आणि धक्काच बसला. काय बोलावं काहीच कळत नव्हतं. त्याच्या अशा अनपेक्षितपणे जाण्याने खूप वाईट वाटलं. प्रत्येक सणासुदीला आम्ही एकमेकांना फोन करायचो. पुण्यात माझ्या पंचाहत्तरीच्या कार्यक्रमासाठी तो वेळ काढून मुंबईहून आला होता. अजितसह घालविलेला वेळ अविस्मरणीय आहे.मी त्याचा खेळ जवळून पाहात त्याचा आनंद घेतला आहे. एक खेळाडू म्हणून अजित अप्रतिमच होता. तो संघासाठी झोकून देत असे. संघाला ज्या खेळाची आवश्यकता असायची, तशीच त्याची खेळी होती. संघ जेव्हा अडचणीत असायचा, तेव्हा अजित नेहमी संयमाने खेळायचा, तसेच जेव्हा वेगाने धावा काढायची गरज असायची, तेव्हा तर त्याच्या आक्रमक फटकेबाजीला तोड नसायची. तो नेहमी विचारपूर्वक फलंदाजी करायचा. डावखुरा असल्याने त्याची खेळी अधिक आकर्षक वाटायची. त्याने क्षेत्ररक्षण करताना स्लीपमध्ये दबदबा निर्माण केला होता. स्लीपमध्ये झेल घेण्याचं त्याचं कौशल्य अतिशय चांगलं होतं.मुंबई क्रिकेटमध्येही अजितचं योगदान मोलाचं ठरलं आहे. शिवाजी पार्क जिमखान्याने क्रिकेट विश्वाला अनेक दिग्गज खेळाडू दिले. यामध्येही अजितने आपलं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. विजय मांजरेकर, सुभाष गुप्ते, रमाकांत देसाई, संदीप पाटील यांसारखे अनेक दिग्गज खेळाडू शिवाजी पार्कने दिले आणि त्यातही अजित वाडेकरने आपले वेगळं स्थान निर्माण केलं. या क्लबचं कर्णधारपदही अजितने यशस्वीपणे सांभाळलं. या जिमखान्यातून जे खेळाडू भारतासाठी खेळले, त्यात अजितचं स्थान आघाडीवर असल्याचं मी मानतो, तसेच मुंबई क्रिकेट असोसिएशनसाठीही त्याने खूप मोठे योगदान दिले. अजितने आपल्या नेतृत्वात मुंबईला अनेकदा जेतेपद पटकावून दिलं, ज्यात रणजी, दुराणी, दुलीप यांसारख्या प्रतिष्ठित स्पर्धांचाही समावेश आहे. कर्णधार म्हणून त्याने विशेष छाप पाडली, हे वेगळं सांगायची गरज नाही, याशिवाय एक व्यवस्थापक म्हणूनही तो उत्कृष्ट होता. त्याची कार्यपद्धती एकदम साधी, परंतु परिणामकारक होती. संघासाठी उपयुक्त निर्णय घेणारा कर्णधार अशी त्याची ओळख होती.मला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे, ती म्हणजे भारतीय क्रिकेटला जी काही ओळख मिळाली किंवा भारतीय क्रिकेटवर जो काही प्रकाश पडला, ते अजित वाडेकरमुळेच. १९७१ साली वेस्ट इंडिज दौरा जिंकून परतल्यानंतर, त्याच्या संघाची विमानतळ ते सीसीआयपर्यंत काढण्यात आलेली विजयी मिरवणूक शानदार होती. यानंतर, भारताने अजितच्याच नेतृत्वात मायदेशातही मालिका जिंकली. म्हणजे पाठोपाठ तीन मालिका भारताने जिंकल्या आणि यावरून अजितच्या नेतृत्वाची कल्पना येते. या विजयामुळे भारतीय क्रिकेटची भरभराट झाली व या यशाचा शिल्पकार अजित वाडेकर असल्याचं मी मानतो.एक व्यक्ती म्हणून अजित मितभाषी होताच, पण तेवढाच तो विनोदीही होता. आम्ही नेहमीच एकमेकांचे यामध्ये पाय ओढायचो. शिवाय कर्णधार, प्रशिक्षक आणि निवड समिती अध्यक्ष म्हणूनही त्याने छाप पाडली. त्याने कधीच आपल्या कामगिरीचा गवगवा केला नाही. खेळाविषयी अनुभव दांडगा असल्याने, अजितला युवा खेळाडूंच्या गुणवत्तेची अचूक पारख होती. कोणत्या खेळाडूमध्ये किती क्षमता आहे, त्याला बरोबर माहीत असायचे. तो आपलं क्रिकेटज्ञान बोलून न दाखविता आपल्या कृतीतून दाखवायचा. अजितची आणखी एक खासियत म्हणजे, आज कोणी समाजात काही कार्य केलं, तर लगेच प्रसिद्धी माध्यमांमध्ये त्यांचे फोटो येतात, पण अजितचं तसं नव्हतं. तो कायम दिव्यांग खेळाडूंसाठी झटला.शब्दांकन : रोहित नाईक

टॅग्स :अजित वाडेकरक्रिकेटभारत