नवी दिल्ली : भारताचा वरिष्ठ सलामीवीर आणि नियमित उपकर्णधार लोकेश राहुल याच्यावर जर्मनीत यशस्वी शस्त्रक्रिया (स्पोर्ट्स हर्निया) पार पडली. तो आणखी काही महिने प्रतिस्पर्धी क्रिकेटला मुकणार आहे. द. आफ्रिकेविरुद्ध स्थानिक टी-२० मालिकेतून बाहेर होण्यास भाग पडल्यापासून राहुल हा पोटाच्या खालच्या भागातील फिटनेसच्या समस्यांनी त्रस्त होता. त्याच्या ओटीपोटाचे स्नायू ताणले गेले होते. शिवाय पायाच्या मांसपेशीदेखील दुखावल्या होत्या.
राहुलने ट्विट केले, ‘मागचे काही आठवडे त्रासदायक होते. यशस्वी शस्त्रक्रिया पार पडल्याने आता मी ठीक आहे. तुमच्या शुभेच्छा आणि प्रार्थनेसाठी आभार. लवकरच भेटू या...’ ३० वर्षांच्या राहुलने गेल्या आठ वर्षांत भारतासाठी ४२ कसोटी, ४२ वन डे आणि ५६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले. भारतात परतल्यानंतर तो एनसीएत क्रीडा वैद्यकशास्त्र प्रमुख डॉ. नितीन पटेल यांच्या मार्गदर्शनात सुधार प्रक्रियेतून जाणार आहे. राहुल मैदानावर कधी परतणार हे माहिती नसले तरी काही महिन्यांचा वेळ निश्चितपणे लगू शकतो. तो काही दिवस विश्रांती घेईल. आशियाई स्पर्धेआधी परत येईल का, हे पाहावे लागेल, असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले. ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकात राहुल भारतीय संघासाठी मोठी जबाबदारी सांभाळण्याची शक्यता आहे.