मुंबई : क्रिकेटच्या वेगवेगळ्या प्रारूपांमध्ये खेळताना अनुकूलता, सहज भाव आणि जुळवून घेण्याची विलक्षण क्षमता यांमुळे यशस्वी जैस्वाल हा इतर खेळाडूंपेक्षा वेगळा ठरतो, असे जैस्वालचे बालपणीचे प्रशिक्षक ज्वाला सिंह यांनी म्हटले आहे. जैस्वालने २२ वर्षे आणि ३६ दिवसांच्या वयात शनिवारी विशाखापट्टणममध्ये इंग्लंडविरुद्ध २०९ धावा करून विनोद कांबळी आणि सुनील गावसकर यांच्यानंतर द्विशतक झळकावणारा सर्वांत युवा फलंदाज होण्याचा मान मिळवला.
ज्वाला यांनी सांगितले की, जर तुम्ही यशस्वीचे ज्युनिअर क्रिकेट पाहिले तर १६ वर्षांखालील मुंबई संघातून खेळताना द्विशतक, १९ वर्षांखालील मुंबई संघासाठी, इराणी चषक, दुलिप चषक आणि विजय हजारे चषकातही त्याने द्विशतक झळकावले आहे. तो आपल्या फलंदाजीतील आक्रमक वृत्तीमुळेच दीर्घ खेळी करण्यात तरबेज आहे. ते म्हणाले की, तो नेहमी गोलंदाजांवर दबाव निर्माण करतो; कारण सातत्याने चौकार लगावत असतो. त्याने स्वत:मधील फलंदाज अशाच प्रकारे घडवला आहे. त्याने फटका लगावण्याची क्षमता आणि स्वत:ची मानसिकताच तशी तयार केली आहे. यालाच अनुकूलता म्हटले जाते. त्याने मुंबईत खेळायला सुरुवात केली तेव्हा येथे खूप स्पर्धा होती. तेव्हा मला संधी मिळेल का, असा यशस्वीला प्रश्न पडायचा. तेव्हा मी त्याला म्हणायचो की, आपल्याला कोणाचीही जागा बळकवायची नाही तर आपली स्वतंत्र जागा निर्माण करायची. त्याने त्याप्रमाणेच स्वत:ची जागा निर्माण केली आहे.
कसोटीत त्याचा दृष्टिकोन वेगळा
टी-२० क्रिकेटमध्ये तो वेगळ्या प्रकारे खेळतो; तर कसोटी क्रिकेटमध्ये त्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. त्याची अनुकूल होण्याची क्षमता आणि सहजप्रवृत्ती नक्कीच इतर खेळाडूंपेक्षा वेगळी आहे. त्यामुळेच यशस्वी संघातील इतर खेळाडूंपेक्षा तो वेगळा ठरतो, असेही ज्वाला म्हणाले.
Web Title: Success's ability to adapt is extraordinary; Coach Jwala Singh: Secret of success revealed
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.