अयाज मेमन, कन्सल्टिंग एडिटर
‘निकलना ख़ुल्द (जन्नत) से आदम का सुनते आए हैं लेकिन बहुत बे-आबरू हो कर तेरे कूचे से हम निकले.’ प्रसिद्ध शायर मिर्झा गालिब यांचा हा लोकप्रिय शेर विराट कोहलीसाठी अलगद लागू पडतो. विराटला वन डे संघाच्या कर्णधार पदावरून हटविताच बीसीसीआयने वाद ओढवून घेतला. भारतीय क्रिकेटमध्ये ज्याचे मोठे योगदान आहे, त्या कोहलीबाबत संवेदनशीलता दाखविली असती तर वाद टाळता आला असता. द. आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी संघ जाहीर करताच वन डे कर्णधारपदातील बदल उघड झाला. तिरस्कार केल्यासारखे कोहलीला बाजूला सारण्यात आले. शिवाय कोहलीसाठी ‘धन्यवाद’ हा शब्दही नव्हता.
यामुळे मीडियात कोहलीच्या चाहत्यांची प्रतिक्रिया उमटणार नसेल तर नवलच. कोहलीकडून रोहितकडे पदभार हसतांतरित होणे हा मुद्दा महत्त्वाचा नव्हता, तर बीसीसीआयने खेळाडू तसेच जगाला दिलेला तो चुकीचा आणि खराब संदेश होता. विस्थापित कर्णधाराचे आभार मानण्यासाठी बीसीसीआयने दुसऱ्या दिवशी ट्वीट केले. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी घडलेल्या प्रकाराचा खुलासा केला. कोहली आमच्यासाठी नहमी वरच्या स्थानावर होता, असेही सांगितले. मात्र, कोहलीला वन-डे तील कर्णधारपदावरून कुठल्या परिस्थितीमुळे हटविले, हे मात्र स्पष्ट केले नाही. विशेष म्हणजे, गांगुलींनी असेही सूचित केले की कोहलीने टी-२० नेतृत्व सोडले नसते तर कदाचित तो तिन्ही प्रकारात एकंदरीत प्रभारी असता. यावरून असा संदेश जातो की रोहित हा मागील २-३ वर्षांतील चांगल्या कामगिरीमुळे तसेच नेतृत्व कौशल्यामुळे नव्हे तर अपवादात्मक स्थितीत टी-२० आणि एकदिवसीय कर्णधार बनला असावा.
कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघ एकही आयसीसी स्पर्धा जिंकू शकला नाही हे सत्य आहे. २०१७ ला भारतीय संघ पाकिस्तानकडून फायनलमध्ये पराभूत झाला, याशिवाय २०१९ च्या वन डे विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात भारतीय संघ न्यूझीलंडकडून पराभूत झाला होता. फलंदाज म्हणून कोहलीचा खराब फॉर्म २०१९ पासून सुरू झाला. तो तीन वर्षे कायम आहे. सर्व प्रकारात आपल्या कामगिरीवर परिणाम होत असल्याचे ओळखून कोहलीने टी-२० विश्वचषकाआधीच टी-२० प्रकाराचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती. कोहलीने वन डे नेतृत्व सोडले नसते तर हे स्पष्ट होते की बीसीसीआय दोन कर्णधारांचे धोरण अवलंबेल. ज्या कालावधीत कोहलीची कामगिरी ढेपाळली त्याच काळात रोहित सर्वोच्च फॉर्ममध्ये आला.
त्यामुळे कर्णधार म्हणून योग्य पर्याय म्हणून उदयास येऊ शकला. नेतृत्व विभागण्याचे काही फायदे आणि तोटेही आहेत. लाल आणि पांढऱ्या चेंडूंच्या खेळासाठी दोन वेगवेगळे कर्णधार नेमण्याचा इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाला मोठा लाभ झाला. दुसरीकडे न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघ सर्व प्रकारात एकाच व्यक्तीकडे नेतृत्व सोपवून उत्कृष्ट वाटचाल करीत आहेत. भारतासंदर्भात हीच बाब प्रभारी ठेवण्यासंदर्भात लागू होते. उदा. कोहली कसोटी कर्णधार बनल्यानंतरही वन डे आणि टी-२० मध्ये महेंद्रसिंग धोनीचा उपकर्णधार होता. पांढऱ्या चेंडूच्या खेळात नेतृत्व करणारी व्यक्ती कसोटीत कर्णधार असणे ही गोष्ट कुठेही आढळत नाही.
BCCI चा निर्णय ठरलेला
कोहलीला एकदिवसीय कर्णधारपदी कायम राहण्याची इच्छा असली तरी रोहितला पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये कर्णधारपद सोपविण्याचा बीसीसीआयचा निर्णय ठरलेला होता. परंतु यावर झालेली कृती केवळ अनपेक्षित नव्हती, तर अपमानास्पद देखील होती. कोहलीवर इतक्या वर्षांपासून नाराजी दाखविण्याची कारणे काय होती, हे बीसीसीआयलाच माहिती नाही पण ज्या पद्धतीने कर्णधारपदाचे संक्रमण घडले ते स्पष्टपणे उद्धटपणाचे होते. अगदी वाईट शब्दात सांगायचे तर जुन्या म्हणीप्रमाणे, ‘हे फक्त क्रिकेट नव्हते!’
Web Title: Such an arrangement by Virat Kohli is unexpected!
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.