Join us  

थुंकीतील शर्करेने होतो चेंडू स्विंंग

क्रिकेट चाहत्याला गोलंदाजाला अचूक मारा करताना बघणे आवडेल पण, वारंवार थुंकी लावताना बघणे त्याला अजिबात आवडणार नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 3:32 AM

Open in App

राम ठाकूरनागपूर : कोविड-१९ महामारीमुळे प्रभावित क्रिकेट जगतात सध्या थुंकीबाबत चर्वितचर्वण सुरू आहे. ऐकण्यास हे वेगळे वाटत असले तरी यात तथ्य आहे. अलीकडेच झालेल्या आयीसीच्या बैठकीमध्ये हा मुद्दा गाजला, यावरून याची गंभीरता दिसून येते. सामान्य स्थितीत गोलंदाज थुंकी किंवा घामामुळे चेंडूला लकाकी आणण्याच्या प्रक्रियेवर कदाचित कुणी गांभीर्याने विचार केला नसेल. आंतरराष्ट्रीय वेगवान गोलंदाजांसाठी थुंकी किती महत्त्वाची ठरू शकते, याचाही कदाचित कुणी विचारही केला नसेल. एकेकाळी पाकिस्तानचे वेगवान त्रिकुट इम्रान खान, वसीम अक्रम व वकार युनिस यांनी रिव्हर्स स्विंगच्या जोरावर क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजवले होते, हे तुम्हाला आठवत असेलच. त्यांच्या या वर्चस्वामध्ये थुंकीची भूमिका महत्त्वाची ठरली होती.कोरोना व्हायरस संक्रमणानंतर क्रिकेट लढतींमध्ये थुंकी व घामाचा वापर करता येणार नाही. गोलंदाजांसाठी थुंकी का गरजेची आहे, हा प्रश्न उपस्थित होतो. क्रिकेट लढतीदरम्यान गोलंदाज वारंवार थुंकी चेंडूला लावताना दिसतो आणि क्रिकेट चाहत्यांना ते अजिबात आवडतही नसावे. का आवडणार? कुठल्याही क्रिकेट चाहत्याला गोलंदाजाला अचूक मारा करताना बघणे आवडेल पण, वारंवार थुंकी लावताना बघणे त्याला अजिबात आवडणार नाही. पण, जाणकारांच्या मते थुंकी गोलंदाजांना बळी घेऊन देण्यात महत्त्वाची ठरते. थुंकीमध्ये शर्करा असल्यामुळे त्यात जडपणा असतो आणि त्यामुळे चेंडू स्विंग करण्यास मदत मिळते. चेंडूचा एक भाग जड झाल्यामुळे टप्पा पडल्यानंतर चेंडू उसळल्यावर फलंदाजांना चेंडू आत येईल की बाहेर जाईल, याचा अंदाज येत नाही. विशेषत: रिव्हर्स स्विंगमध्ये गोलंदाजांसाठी हे अस्त्र उपयुक्त ठरते. थुंकी व घामाचा वापर करण्यावर बंदी घातल्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाजांना अधिक अडचण होईल. कसोटी क्रिकेटमध्ये एका चेंडूने जवळजवळ ८० षटके गोलंदाजी केली जाते आणि चेंडू जुना झाल्यानंतर त्याची लकाकी कमी होत जाते आणि थुंकी व घामाचा वापर करण्यात मनाई करण्यात आली तर गोलंदाजांसाठी चेंडू स्विंग करणे कठीण होईल.गेल्या आठवड्यात व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आयोजित आयसीसीच्या बैठकीमध्ये क्रिकेट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना थुंकीच्या वापराबाबत वेगवेगळ्या सूचना केल्या. त्यात कृत्रिम पदार्थाच्या वापराबाबतही चर्चा झाली. पण, देश-विदेशातील माजी व विद्यमान क्रिकेटपटूंनी या कृत्रिम पदार्थाच्या वापरावर प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या मते, या पदार्थाच्या वापरामुळे चेंडू छेडखानीचा मुद्दाही उपस्थित होऊ शकतो. या व्यतिरिक्त कृत्रिम पदार्थांमध्ये नखांसारख्या वस्तूही येतील. कायद्यानुसार त्यावर बंदी आहे. जसे कोविड-१९ ला हरविण्यासाठी लढा सुरू आहे त्याचप्रमाणे गोलंदाजांही यावर युक्ती शोधून काढतील, अशी आशा आहे.>गोलंदाजांपुढे आव्हानक्रिकेट चाहत्यांच्या मनोरंजनासाठी खेळपट्ट्या फलंदाजांना अनुकूल ठरण्याच्या उद्देशाने पाटा करण्यात येत आहेत. दरम्यान, कसोटी क्रिकेट गोलंदाजांनाही याचा लाभ होत आहे.जर गोलंदाजांचे कोपर १५ अंशापेक्षा अधिक वाकत असेल तर ते अवैध मानल्या जाईल आणि चेंडू थ्रो समजल्या जाईल.सुरुवातीच्या दिवसांमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाजांना बाऊन्सरसाठी कुठली मर्यादा नव्हती. पण, वेळेनुसार बाऊन्सर्सवर मर्यादा आणण्यात आल्या. आता प्रति षटक दोन बाऊन्सर्सची मर्यादा आहे.विशेषत: झटपट क्रिकेटमध्ये ३० यार्डमध्ये अधिक क्षेत्ररक्षक तैनात करण्याच्या नियमाचा फलंदाजांना लाभ होतो.अंधूक प्रकाश झाल्यानंतर फलंदाजांना अधिक महत्त्व दिल्या जाते. परिस्थिती बघून पंच वेगवान गोलंदाजांना गोलंदीज करण्यापासून रोखू शकतात. परिस्थिती अधिक वाईट झाली तर सामना थांबविण्यात येतो.चेंडू थोड्या फरकानेही लेग स्टंपच्या बाहेर गेला तरी वाईड दिल्या जाते. त्यामुळे लेग स्पिन किंवा लेग कटर यासारखे कौशल्य जवळजवळ संपुष्टात आले आहे.