हैदराबाद : गोलंदाजांच्या नियंत्रिक माऱ्यानंतर शिखर धवनच्या (७७*) तडाखेबंद नाबाद अर्धशतकाच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने यंदाच्या आयपीएलमध्ये विजयी सलामी देत राजस्थान रॉयल्सचा ९ गड्यांनी धुव्वा उडवला. दोन वर्षांनी पुनरागमन करत असलेल्या राजस्थानला सांघिक खेळ करण्यात अपयश आले. राजस्थानने ९ बाद १२५ अशी मजल मारल्यानंतर हैदराबादने १५.५ षटकातच एका फलंदाजाच्या मोबदल्यात १२७ धावा काढल्या.राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर राजस्थानला माफक धावसंख्येत रोखल्यानंतर रिद्धिमान साहाच्या (५) रुपाने हैदराबादला दुसºयाच षटकात झटका बसला. परंतु स्टार फलंदाज धवनने ५७ चेंडूत १३ चौकार व एका षटकारासह नाबाद ७७ धावांचा विजयी तडाखा दिला. कर्णधार केन विलियम्सने ३५ चेंडूत ३ चौकार व एका षटकारासह नाबाद ३६ धावा करत धवनला अखेरपर्यंत साथ दिली.तत्पूर्वी, गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर हैदराबादने राजस्थानचा पहिला डाव निर्धारीत २० षटकात ९ बाद १२५ असा रोखला. संथ फलंदाजी व फटकेबाजीतील अपयशाचा फटका राजस्थानला बसला. दोन्ही संघ यंदा आपल्या नियमित कर्णधारांविना खेळत आहेत. युवा संजू सॅमसनने ४२ चेंडूत ५ चौकारांसह ४९ धावांची खेळी करत राजस्थानकडून अपयशी झुंज दिली. इतर कोणालाही चमक दाखवता आली नाही. कर्णधार अजिंक्य रहाणे (१३), डी. शॉर्ट (४), स्टार अष्टपैलू बेन स्टोक्स (५), राहुल त्रिपाठी (१७), जोस बटलर (६) हे प्रमुख फलंदाज अपयशी ठरल्याचा फटका राजस्थानला बसला. अष्टपैलू शाकिब अल हसन आणि सिद्धर्थ कौल यांनी प्रत्येकी २ बळी घेत राजस्थानची कोंडी केली. (वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलक :राजस्थान रॉयल्स : २० षटकात ९ बाद १२५ धावा (संजू सॅमसन४९, श्रेयश गोपाल १८; सिद्धर्थ कौल २/१७, शाकिब अल हसन २/२३) पराभूत वि. सनरायझर्स हैदराबाद : १५.५ षटकात १ बाद १२७ धावा (शिखर धवन नाबाद ७७, केन विलियम्सन नाबाद ३६; जयदेव उनाडकट १/२८).
- Cricket Buzz»
- बातम्या»
- IPL 2018 : धवनच्या जोरावर सनरायझर्सची ‘रॉयल’ सलामी
IPL 2018 : धवनच्या जोरावर सनरायझर्सची ‘रॉयल’ सलामी
गोलंदाजांच्या नियंत्रिक माऱ्यानंतर शिखर धवनच्या (७७*) तडाखेबंद नाबाद अर्धशतकाच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने यंदाच्या आयपीएलमध्ये विजयी सलामी देत राजस्थान रॉयल्सचा ९ गड्यांनी धुव्वा उडवला.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 3:47 AM