दोहा - भारतीयफुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री याने केलेल्या दोन गोलच्या जोरावर भारताने २०२२ फुटबॉल विश्वचषक आणि २०२३ एशियन कप क्वालिफायरच्या ग्रुप ई मध्ये दुसऱ्या फेरीत बांगलादेशविरुद्ध झालेल्या लढतीत बांगलादेशवर २-० अशा फरकाने विजय मिळवला. या विजयासोबतच छेत्रीने अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लियोनेल मेस्सीलाही मागे टाकले आहे.
सामन्यातील ७९ व्या मिनिटाला गोल करून सुनील छेत्रीने भारतीय संघाचे खाते उघडले. त्यानंतर सामन्यातील (९०+2) मिनिटाला अजून एक गोल करत छेत्रीने ग्रुप ई मधील या लढतीत भारतीय संघाचा विजय निश्चित केला. यादरम्यान सुनील छेत्रीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधील आपल्या गोलची संख्या ७४वर पोहोचवली आहे. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सध्या खेळत असलेल्या फुटबॉलपटूंमध्ये ख्रिस्टियानो रोनाल्डो १०३ गोलसह अव्वल स्थानावर आहे.
या लढतीतील दोन गोलसोबतच सुनील छेत्री सर्वाधिक गोल करणाऱ्या फुटबॉलपटूंच्या यादीत सुनील छेत्री ११व्या स्थानावर पोहोचला आहे. त्यांच्या पुढे दहाव्या क्रमांकावर तीन खेळाडू आहेत. हंगेरीचा सेंडर कोक्सिस, जपानचा कुनिशिगे कामटे आणि कुवेतचा बशर अब्दुल्लाह प्रत्येकी ७५ गोलसह संयुक्तरीत्या दहाव्या क्रमांकावर आहे. सुनील छेत्रीच्या मागे असलेल्या युएईच्या अलीने गेलया आठवड्यात मलेशियाविरुद्धच्या लढतीत आपला ७३ वा गोल केला होता. तर मेसीचे आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये ७२ गोल आहेत.
दरम्यान, पात्रता स्पर्धेत ३ जूनला झालेल्या लढतीत भारताला कतारकडून ०-१ अशा फरकाने पराभूत व्हावे लागले होते. मात्र त्यानंतर बांगलादेशला पराभूत करत भारताने स्पर्धेत पुनरागमन केले आहे. आता भारताचा पुढील सामना १५ जून रोजी अफगाणिस्तानशी होणार आहे. दरम्यान, भारतीय संघ २०२२ च्या विश्वचषक स्पर्धेच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडला आहे.