IND vs SA Test Series: भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली दुखापतीमुळे दुसरी कसोटी खेळू शकला नाही. त्याच्या जागी केएल राहुलला नेतृत्व करण्याची संधी देण्यात आली होती. पण भारतीय संघाला आफ्रिकेविरूद्ध पराभव पत्करावा लागला. भारताने दुसऱ्या डावात खराब कामगिरी केली. अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांच्या अर्धशतकांच्या बळावर भारताने आफ्रिकेला द्विशतकी आव्हान दिले. पण ते आव्हान यजमानांनी सहज पेललं. भारतीय संघाची मैदानावर अपेक्षित आक्रमकता दिसली नाही, असं मत अनेकांनी व्यक्त केलं. याच मुद्द्यावर माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी मत मांडलं. तसेच, पुजारा आणि रहाणे यांच्या खेळीबद्दलही वक्तव्य केलं.
"खरं पाहता विराट कोहली कर्णधार म्हणून न खेळलेली ही पहिलीच कसोटी आहे जी भारत हारलाय. याआधी जेव्हा विराटच्या जागी कोणी दुसरा खेळाडू नेतृत्व करायचा तेव्हा आपण कसोटी जिंकलो होतो. केएल राहुलबद्दल बोलायचं झालं तर मी म्हणेन की डीन एल्गरला डावाच्या सुरूवातीलाच एकेरी धावा देणं हे आफ्रिकेसाठी फायदेशीर ठरलं. डीन एल्गर हा हवाई फटके खेळणारा फलंदाज नाही. त्यामुळे त्याच्या साठी सीमारेषेवर फिल्डर ठेवण्यात काहीच अर्थ नव्हता. कारण तो आरामात एकेरी धावा घेऊन स्कोअरबोर्ड हलता ठेवत होता. राहुलने फिल्डिंग लावताना केलेली चूकच आफ्रिकेला विजय मिळवून देण्यास फायदेशीर ठरली", अशा शब्दात गावसकरांनी केएल राहुलवर टीका केली.
पुजारा-रहाणेबद्दल गावसकर म्हणतात...
"चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे दोघांनाही कामगिरी चांगली होत नसूनही संघात स्थान देण्यात आले होते. त्यांचा अनुभव आणि आतापर्यंत त्यांनी केलेल्या उपयुक्त खेळी यांच्या जोरावर त्यांना संधी देण्यात आली होती. काही वेळा आपण नव्या खेळाडूंसाठी इतके आग्रही होतो की जुन्या-जाणत्या खेळाडूंबाबत कठोर निर्णय घ्यायचा विचार करत असतो. नवे खेळाडू संघात यायला हवेत यात वाद नाहीच. पण जुने-अनुभवी खेळाडू जोपर्यंत विचित्र फटके मारून बाद होत नाहीत तोपर्यंत त्यांच्यावर विश्वास दाखवायला हवा. जोहान्सबर्ग कसोटी तरी या दोघांनी त्यांच्यावरील विश्वास सार्थ ठरवला आहे", अशा शब्दात गावसकरांनी रहाणे-पुजारा जोडीचं कौतुक केलं.