ऑस्ट्रेलियाकडून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये झालेल्या पराभवानंतर रोहित शर्मा अँड टीमवर जोरदार टीका झाली. महत्त्वाच्या सामन्यासाठी हा संघ पुरेपूर तयारीच करत नसल्याचा आरोप झाला. आयपीएल २०२३ नंतर लगेच एका आठवड्यात भारतीय खेळाडू WTC Final खेळण्यासाठी लंडनमध्ये दाखल झाले. पराभवानंतर रोहित शर्मानेही मान्य केले की कसोटी क्रिकेटच्या तयारीसाठी २०-२५ दिवसांचा कालावधी हवा आहे. पण, महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी या वक्तव्यावरून टीका केली. संघातील सीनियर्स खेळाडूच तयारीसाठी आधी जायला नकार देतात, कारण त्यांना माहित्येय की संघातील त्यांचे स्थान पक्के आहे.
“आम्ही कोणत्या प्रकारच्या तयारीबद्दल बोलत आहोत? आता ते वेस्ट इंडिजला गेले आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे उदाहरण तुमच्यासमोर आहे. तुम्ही कोणता सामना खेळत आहात का? मग ही २०-२५ दिवसांची चर्चा काय?” असे सुनील गावस्कर यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले. WTC Final नंतर एक महिना सुट्टीवर गेलेली टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यावर एकत्रित आली. दोन सामन्यांच्या मालिकेत पहिली कसोटी तीन दिवसांत जिंकून टीम इंडियाने १-० अशी आघाडी घेतली.
“आज जो वेस्ट इंडिजचा संघ आहे, त्यांना तुम्ही कसोटी सामन्याच्या एक दिवस आधी जाऊनही पराभूत करू शकता. परंतु हे आपल्याला या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करू नये की जेव्हा आपण तयारीबद्दल बोलता तेव्हा त्याबद्दल प्रामाणिक रहा. १५ दिवस आधी जा, दोन सराव सामने खेळा. मुख्य लोक विश्रांती घेऊ शकतात, परंतु राखीव खेळाडू, चांगली कामगिरी करत नसलेल्या काही खेळाडूंसाठी ते फायद्याचे ठरेल,” असे गावस्कर पुढे म्हणाले.
त्यांनी हे देखील नमूद केले की, जगातील सर्वोत्तम तंदुरुस्त संघांपैकी एक असल्याचा दावा करूनही, रोहित शर्मा आणि कंपनीला वारंवार दुखापत होत आहे. “सत्य हे आहे की मुख्य खेळाडूंना लवकर जायचे नसते कारण त्यांना माहित असते की काहीही झाले तरी त्यांची निवड होईल. तुम्ही लवकर जाल तेव्हा ते वर्क लोडबद्दल बोलतील. तुम्ही स्वत:ला जगातील सर्वात तंदुरुस्त संघ म्हणता किंवा आधीच्या पिढ्यांपेक्षा तंदुरुस्त आहात, मग तुम्ही इतक्या लवकर कसे थकता? २० षटकांचा खेळ खेळता तेव्हा तुम्हाला वर्कलोडची समस्या कशी येते?" असेही ते म्हणाले.