नवी दिल्ली ।
भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. आजपासून इंग्लंड आणि भारतीय संघामध्ये एकदिवसीय मालिकेचा थरार रंगला आहे. टी-२० विश्वचषक २०२२ अवघ्या काही महिन्यांवर आहे. मात्र विश्वचषक तोंडावर असताना भारतीय संघातील वाद वाढण्याची चिन्हं आहेत. कारण संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या फॉर्मवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या वादावरून कर्णधार रोहित शर्मा, ऑस्ट्रेलियाचा फलंदाज उस्मान ख्वाजा यांनी कोहलीची पाठराखण केली होती. दरम्यान आता भारतीय संघाचे दिग्गज सुनील गावसकर यांनी कोहलीला विरोध करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. त्यातच त्यांनी रोहित शर्मावर निशाणा साधला आहे.
भारताला १९८३ मध्ये विश्वविजेता बनवणारे कर्णधार कपिल देव यांनी काही दिवसांपूर्वी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनचे उदाहरण देत संघाने आता युवा खेळाडूंना संधी द्यायला हवी असे म्हटले होते. अर्थात कपिल देव यांनी कोहलीचा फॉर्म पाहता त्याला विश्रांती देण्याचे म्हटले. मात्र याच्यावरून आता वाद चिघळला आहे. तसेच व्यंकटेश प्रसाद आणि विरेंद्र सेहवाग या माजी क्रिकेटपटूंनी कोहलीला आराम देऊन युवा खेळाडूंना संधी देण्याचे संकेत दिले आहेत.
गावसकर नक्की काय म्हणाले-
दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर विराट कोहलीच्या मदतीला धावले आहेत. रोहित, ख्वाजा या पाठोपाठ आता गावस्करांनी देखील कोहलीची पाठराखण केली आहे. फॉर्म हा तात्पुरता असतो, क्लास कायमस्वरूपी असतो अशा शब्दांत त्यांनी कोहलीच्या विरोधकांना सुनावले. याशिवाय रोहित जेव्हा धावा करत नाही, तेव्हा कोणी प्रश्न का विचारत नाही असा सवालही त्यांनी केला. कोहलीला विश्वचषकासाठी तयार होण्यासाठी पुरेसा वेळ असल्याचेही गावस्करांनी टीकाकारांना ठणकावले.
"मला कळत नाही की जेव्हा रोहित शर्मा धावा करत नाही, तेव्हा कोणीच काही का बोलत नाही. याशिवाय इतर कोणता फलंदाज धावा करत नसेल तेव्हाही कोणी काही बोलत नाही. फॉर्म हा तात्पुरता असतो क्लास कायमस्वरूपी असतो. आपल्याकडे एक चांगली निवड समिती आहे. त्यांच्याकडे विश्वचषकासाठी संघाची घोषणा करण्यासाठी आणखी २ महिन्यांचा कालावधी असून आशिया कपदेखील खेळला जाणार आहे. त्यामुळे संघाने कोहलीला थोडा वेळ द्यायला हवा मग निर्णय घ्यावा", अशा शब्दांत गावसकरांनी कोहलीच्या खेळीचे कौतुकही केले.
पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर कोहली का जाणार नाही हे पाहण्याजोगे आहे. कारण सध्या तो इंग्लंडविरूद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाचा भाग आहे.