Team India out of T20 World Cup: विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत इंग्लंडचा विजय आणि टीम इंडियाच्या दारुण पराभवानंतर भारतीय क्रीडा चाहते निराश झाले आहेत. त्याचबरोबर रोहित शर्मा आणि संघाच्या कामगिरीवरही क्रिकेट दिग्गजांनी नाराजी व्यक्त केली आहे. एडिलेडमध्ये भारतीय संघाच्या पराभवावर दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी अतिशय जळजळीत प्रतिक्रिया दिली. पराभवाची ५ कारणे सांगत आता काही खेळाडूंनी निवृत्त घेऊन टाकावी, असा सल्लाच त्यांनी सिनियर खेळाडूंना दिला. पाहूया त्यांनी सांगितलेली पराभवाची पाच कारणे-
१. पॉवर प्ले मध्ये दमदार कामगिरी केली पाहिजे होती. टीम इंडियाला महत्त्वाचे सामने जिंकायचे असतील तर पॉवर प्लेमध्ये धमाका करावा लागेल. भारत प्रत्येक पॉवरप्लेमध्ये विकेट गमावतोय त्यामुळे संघाचा तोटाच होतोय.
२. पॉवर प्लेमध्ये गोलंदाजांना विकेट्स घेता येत नसतील तर विजयाचा पाया रचता येत नाही. टीम इंडियाला गोलंदाजीच्या या क्षेत्राकडे लक्ष द्यावे लागणार आहे.
३. टीम इंडियाचा मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमराहची अनुपस्थिती जाणवली. ते इंग्लंडविरुद्धच्या पराभवाचे एक कारण ठरले. मोहम्मद शमीने प्रयत्न केला, पण त्याला जसप्रीत बुमराहची जागा भरून काढता आली नाही.
४. टीम इंडियाच्या अव्वल गोलंदाजांपैकी एक असलेल्या भुवनेश्वर कुमारची कामगिरी खराबच होत राहिली. भुवीने सुरुवातीला चांगली गोलंदाजी केली, पण मोठ्या सामन्यांमध्ये त्याला फारसा प्रभाव पाडता आला नाही. याकडे आता भारताला लक्ष द्यावे लागेल.
५. नवीन गोलंदाज अर्शदीप सिंगच्या कामगिरीचे कौतुक केले पाहिजे. परंतु अनुभवाचा अभाव हे पराभवाचे एक कारण असल्याचे दिसले. अर्शदीपने विकेट घेतल्या, पण मोठ्या सामन्यात त्याचा अनुभव कमी पडला.