Sunil Gavaskar, IND vs SA T20 World Cup: भारतीय संघाला टी२० विश्वचषक २०२२ मध्ये पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले. दक्षिण आफ्रिके विरूद्धच्या सामन्यात भारतीय फलंदाजांची बाऊन्सर चेंडूंवर अक्षरश: तारांबळ उडाली. दक्षिण आफ्रिकेच्या प्लॅनमध्ये भारतीय फलंदाज अलगद फसले. केवळ सूर्यकुमार यादवने आपला फॉर्म कायम राखत अर्धशतक ठोकले. त्याच्या खेळीच्या जोरावर भारताने कशीबशी १३४ धावांपर्यंत मजल मारली. पण तितके आव्हान आफ्रिकेला रोखण्यासाठी पुरेसे ठरले नाही. सामन्यात भारताच्या फिल्डिंगच्या वेळी अनेक गोष्टी घडल्या. पण त्यातही सामन्याला कलाटणी देणारा प्रसंग म्हणजेच 'टर्निंग पॉईंट' कोणता ठरला, याबद्दल भारताचे लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी मत व्यक्त केले.
"कॅच सुटणे किंवा रन आऊट मिस होणे अशा गोष्टी क्रिकेट सामन्यात होतच असतात. त्यामुळे संघाच्या पराभवाला आपण त्या एका व्यक्तीला किंवा एका घटनेला गृहित धरू शकत नाही. ज्यावेळी नशिब तुम्हाला साथ देत नाही, तेव्हा अतिशय उत्तम असलेल्या फिल्डरकडूनही कॅट सुटतो किंवा रन आऊटची संधी मिस होते. मला असं वाटतं की सामन्याचा सर्वात मोठी समस्या ठरली ते एकाच गोलंदाजाने चार षटकांत दिलेल्या ४३ धावा. मला असं वाटतं की युजवेंद्र चहलला नेदरलँड्स विरूद्धच्या संघात स्थान द्यायला हवे होते. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला असता आणि पुढील सामन्यांसाठी तो तयार झाला असता," असे रोखठोक मत सुनील गावसकर यांनी व्यक्त केले.
केएल राहुलच्या जागी रिषभ पंतला खेळवा!
"भारताचे मानसोपचार विषयक कोच (Mental Conditining Coach) पॅडी अप्टन यांचे काहीच योगदान दिसत नाही. त्यांनी लोकेश राहुलशी चर्चा करायला हवी. तो चांगला फलंदाज आणि तो चांगली खेळी करू शकतो हे त्याला पटवून द्यायला हवे. भारताकडे सध्या दुसरा ओपनर नाहीये. राहुलची जागा घेईल असा ओपनर सध्या तरी भारतीय संघात मला दिसत नाही. राहुल जेव्हा लयीत असतो तेव्हा दमदार खेळ करतो. पण आफ्रिकेविरूद्ध त्याने अक्षरश: सराव सत्रासारखी कॅच प्रक्टिस दिली आणि तो आऊट झाला. आता झिम्बाब्वे विरूद्धच्या सामन्यात पावसाची चिन्हे आहेत. अशा परिस्थितीत बांगलादेशशी असलेला सामना भारतासाठी महत्त्वाचा आहे. अडलेडच्या मैदानाच्या उजव्या आणि डाव्या बाजूच्या बाऊंडरी छोट्या आहेत. अशा परिस्थितीत रिषभ पंतला ओपनिंगला खेळवण्याचा पर्याय चांगला ठरू शकतो. तो सुरूवातीच्या षटकांमध्ये दमदार फलंदाजी करू शकतो," असा सल्ला गावसकरांनी दिला.
Web Title: Sunil Gavaskar Explains Turning point of the match IND vs SA T20 World Cup 2022 R Ashwin Virat Kohli Rohit Sharma
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.