रायपूर : शुबमन गिल सध्या करिअरच्या शिखरावर आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात द्विशतक झळकावले तर दुसऱ्या सामन्यात भारतीय सलामीवीराने नाबाद 40 धावांची खेळी केली. गिल सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. दुसऱ्या सामन्यात नाबाद राहिल्यानंतर त्याला एक नवे नाव मिळाले आहे. त्याने भारतासाठी 20 वन डे सामने खेळले आणि दुसऱ्या सामन्यांनंतर त्याची वनडेमध्ये सरासरी 71.38 एवढी झाली आहे.
दरम्यान, दुसऱ्या वन डे सामन्यानंतर शुबमन गिल आणि भारताचे दिग्गज सुनील गावस्कर यांच्यात संभाषण झाले आणि या संभाषणादरम्यान गावस्कर यांनी त्याला एक नवीन नाव दिले. गावस्कर यांनी युवा सलामीवीराला सांगितले की, मी तुला 'स्मूथमन' गिल हे नवीन टोपणनाव दिले आहे. मला आशा आहे की तुझी यावर काहीच हरकत नसेल.
शुबमननं जिंकली मनंशुबमन गिलने गावस्करांना प्रत्युत्तर देताना माझा काही आक्षेप नसल्याचे म्हटले. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात गिलने 19 डावात 1000 धावा पूर्ण केल्या. ही कामगिरी करणारा तो सर्वात जलद भारतीय फलंदाज ठरला. त्याने विराट कोहली आणि शिखर धवनला याबाबतीत मागे टाकले, ज्यांनी या फॉरमॅटमध्ये 24 डावात 1000 धावा पूर्ण केल्या होत्या.
भारताची विजयी आघाडी रोहित शर्मा अँड कंपनीने न्यूझीलंडचा दुसऱ्या वन डे सामन्यात आठ गडी राखून पराभव करून किवीविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. न्यूझीलंडविरूद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात भारतीय गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले. या सामन्यात मोहम्मद शमीने तीन, हार्दिक पांड्या आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी 2-2 बळी घेतले. तर शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी 1-1 बळी घेण्यात यश आले. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडचा संघ 34.3 षटकात 108 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात भारताने लक्ष्याचा पाठलाग आठ गडी आणि 29.5 षटके राखून केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"